आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात गुंडाराज आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यावर पीडित महिला रोशनी शिंदे यांनी तीव्र शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
रोशनी शिंदे काय म्हणाल्या?
रोशनी शिंदे म्हणाल्या की, ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ते काय गुंडगिरी करण्यासाठी का? मारहाण प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी बोलत नाही तर प्रत्येक गोष्टीचा न्याय झाला पाहिजे. कित्येक महिलांवर अन्याय होत आहे, आम्ही किती दिवस शांत बसायचे. तुमच्या सोबत आहेत त्या महिला आणि आम्ही काय रस्त्यावरील आहोत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला असून हे सर्व बंद करावे, अशी विनंती केली आहे.
नेमके प्रकरण काय?
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. घोडबंदर (ठाणे) येथील कासारवडवली भागातील शोरूममध्ये घुसून ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी अमानुष हल्ला केला. स्थानिक पोलिसांनी अद्याप या घटनेचा एफआयआर दाखल केलेला नाही, असा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
महिला आयसीयूमध्ये
शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. त्याला आक्षेपार्ह म्हणत शिंदे गटाने त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
रोशनी शिंदेंच्या पोटात लाथा मारल्या
उद्धव ठाकरे म्हणाले, रोशनी शिंदे यांनी एकनाथ शिंदेंबद्दल काही पोस्ट टाकली म्हणून त्यांना निर्घृण मारहाण करण्यात आली. गुंडांनी आधी त्यांना व्हिडिओद्वारे माफी मागायला लावली. रोशनी शिंदे यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या पोटात निर्घृणपणे लाथा मारण्यात आल्या. रोशनी शिंदे या गर्भधारणेसाठी उपचार करत आहेत. त्यामुळे पोटात मारू नका, अशी विनवणी त्यांनी केली. त्यानंतरही गुंडांनी दयामाया न दाखवता मारहाण केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.