आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंची टीका:मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत थोडक्यात वाचले

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

प्रामाणिकपणामुळे भाजप विजयी

आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजप जिंकली, असे नारायण राणे म्हणाले. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत थोडक्यात वाचले

शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे अवघ्या एका मताने जिंकून आले आहेत. ते या निवडणुकीत काठावर पास झाले आहेत. थोडक्यात ते आमच्या हातातून वाचले. अन्यथा शिवसेनेचा एकही उमेदवार जिंकून आला नसता, असा दावा नारायण राणे यांनी केला. तसेच, राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच मुंबई महापालिकाही भाजपच जिंकेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेचे जेमतेम 20 आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेला सत्तेत असून मते मिळाली नाहीत

महाविकास आघाडीची जेवढी मते शिवसेनेला मिळायला हवी होती, तेवढीही मते शिवसेनेला सत्तेत असूनही मिळाली नाहीत. तुमचे 8, 9 आमदार फुटतात. तुमची विश्वासार्हता कुठे आहे?, असा सवाल नारायण राणे यांनी केला. तसेच आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. तुमचीच मते आम्ही फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी 145 मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे राऊत म्हणाले.

शरद पवारांकडून शिकावे

राज्यसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीसांनी माणसे जपली, आमदारांचा विश्वास संपादन केला, असे पवार म्हणाले. खऱ्याला खरे म्हणणाऱ्या शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांनी शिकावे. मात्र, त्यांचा स्वभाव माहित असल्यामुळे ते सत्य स्वीकारतील, अशी आपल्याला अजिबात अपेक्षा नसल्याचे शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...