आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचा इशारा:'खोके क्रांती' करण्यात बिल्डर आशर यांचा आर्थिक हातभार, विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे. मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे, असा आरोप आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

तसेच, बिल्डर आशर यांच्याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत व ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.

ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या उपाध्यपदी बिल्डर अजय आशर यांची नियुक्ती तसेच महाराष्ट्र कर्नाटक-सीमावादावरून शिंदे व भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

खोके सरकारचे ‘टेकू’

ठाकरेंनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना.

सुरतला ‘हिसाब-किताब’

ठाकरेंनी म्हटले आहे की, अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्या आशीष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता. आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात,’ असा आरोप भाजपच्या शेलारांचा होता. आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले.

शिंदे उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले

ठाकरेंनी म्हटले आहे की, विरोधी पक्ष हात चोळत बसणार नाही. तो एकजुटीने सरकारला सळो की पळो करून सोडेल. महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्व समावेशक विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मुख्यमंत्री व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री आहेत, पण हे अजय आशरच ही संस्था चालवतील. कारण आशीष शेलार यांचाच दावा होता की, आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत.

‘कारे’वाले शेपूट घालून बसले

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर ठाकरेंनी म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केलाय. त्यावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल. आता इथेही भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ भाजपचे हे ढोंग आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले. महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते.

कर्नाटक आत घुसला आहे

ठाकरेंनी म्हटले आहे की, मुळात जे छत्रपती शिवरायांचा अपमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद आहे. महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आजही एका सुरात हे ठणकावून बोलायला तयार नाहीत की, ‘‘बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्राचाच! आणि तो पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’ शिंदे-फडणवीस यांनी एकदा तरी ही गर्जना केली काय? तिकडे कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्राच्या गावांवरही दावा ठोकतात व महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त ‘अरे’ ला ‘कारे’ बोलू असे बोलतात! हे म्हणजे असेच झाले की, चीनने लडाखमध्ये घुसून आपला भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर ‘आम्ही त्यांना आमची इंचभरही जमीन त्यांना घेऊ देणार नाही,’ असा दम भरायचा! अरे बाबांनो, ते आधीच हातभर आत घुसले आहेत.

हिंमतबाज मर्दाचे मनगट लवकरच दिसेल

ठाकरेंनी म्हटले आहे की, कानडी सरकारची ही ‘घुसखोरी’ फक्त नेभळट, लाचार आणि गुजरातच्या ताटाखालचे मांजर बनलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यामुळेच सुरू आहे. खोके सरकारचे आमदार महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या देतात. दुसरे आमदार शिवसेना नेत्यांना आई-बहिणीवरून कॅमेऱ्यासमोर शिव्या देतात. अशा नव्या विकृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे. तो एकत्रित मोडून काढावाच लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. त्यावर ठोस भूमिका घेतली आहे असे कुठेच दिसत नाही. शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे. शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल.

बातम्या आणखी आहेत...