आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार फडणवीसांवर लादलेले:भाजपचे मंत्री शिंदेंना मुख्यमंत्री मानण्यास तयार नाहीत, सरकार कोलमडून पडेल, ठाकरेंचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर मनापासून समाधानी आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर आज फडणवीस यांना मानणारेही नीट देणार नाही. हे सरकार फडणवीस यांच्यावर लादले आहे, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

भाजपचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत. यापुढे भाजपच्या मोठ्या गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील व त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

फडणवीसांचे पंख कापले

ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज शिंदे सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत. श फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले?

कर्नाटक वादात शिंदे गायब

ठाकरेंनी म्हटले आहे की, सीमा प्रश्न हा भावनिक व अस्मितेचा विषय आहे. 30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते. या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दिल्लीच्या नाकर्तेपणाचे सर्व ओझे आता त्यांच्या खांद्यावर येईल; कारण ‘सीमा प्रश्नासाठी आम्ही चाळीस दिवस बेळगावच्या तुरुंगात होतो,’ असा डांगोरा त्यांनीच पिटला आहे. त्यामुळे ते आता काय करणार?

अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत

ठाकरेंनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील व शंभू राजे देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत. शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एकंदरीत धोरण आहे. चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मंत्रालयात पैशांच्या मोठय़ा उलाढाली सुरू आहेत. त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, असे भाजपवालेच सांगतात. कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाहीत.

फडणवीस हे ओझे कसे पेलणार?

ठाकरेंनी म्हटले आहे की, चाळीस आमदारांना महाराष्ट्रातील रस्ते, बांधकाम, पालिकेचे ठेके हवे आहेत. ते मिळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाणे महानगरपालिकेत नेमके काय व्यवहार झाले व मलई कोठे गेली व ती किती हजार कोटींची होती? याचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच हे सर्व आदेश दिले जातात. हे खरे मानले तर फडणवीस हे सर्व ओझे कसे पेलणार? हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात ‘बाजीरावी’चे नवे रूप

ठाकरेंनी म्हटले आहे की, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना सोडली असे शिंदे व त्यांचे लोक सांगत होते, पण शिवरायांचा अपमान होऊनही यांचे हिंदुत्व अजगराप्रमाणे झोपून राहिले व हिंदुत्वाचे ढोंग उघडे पडले. आधी राज्यपाल कोश्यारी, नंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व आता महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा. रोज अपमानास्पद वक्तव्ये सुरू आहेत. लोढा यांनी तर शिंदे यांच्या ‘पलायना’ची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. नवा इतिहास लिहिला जात आहे. सरकार दाढीवर हात फिरवत मजा घेत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय शिंदे यांनी काढला, पण कर्नाटकचे लोक सांगलीत घुसले तरी यांच्या स्वाभिमानाने हालचाल केली नाही! कारण सगळेच जण दांडगाई व खुषामतखोरीत मग्न आहेत. लोकहितवादींनी दिलेला एक संदर्भ आठवतो. ‘‘बाजीरावीत सौदेगिरी फार माजली. त्यावेळेस उनाड लोक शेंडी, संजाबदार, पागोटे पंगणीदार, जोडा अणीदार, अंगरखा कळीदार, मिशा पिळदार, धोतरे चुणीदार, भोवया कमानदार, गंध साखळीदार आणि छाती गोलदार अशी ढोंगे करू लागले. पूर्वीचा साधेपणा गेला.’’ आज त्याच ‘बाजीरावी’चे नवे रूप महाराष्ट्रात दिसू लागले आहे!

मंत्र्यांना बळी देणे शोभले नाही

ठाकरेंनी म्हटले की, तीर्थयात्रा हेच राज्य सरकारचे मुख्य कार्य झाले आहे. हा विषय फक्त श्रद्धा आणि दर्शनापुरता मर्यादित राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या गटाचे चाळीस आमदारही होते व ते सर्व नवस फेडण्यासाठी आसामला गेले. नवस फेडण्यासाठी या सर्व लोकांनी प्राण्यांचे बळी दिले व त्याचे समर्थन महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य करतात हे राज्याच्या परंपरेला साजेसे नाही. अंधश्रद्धेविरुद्ध बुलंद काम करणारे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी बेइमानी करणारे हे कृत्य. ईश्वरावर श्रद्धा हवीच, पण त्या श्रद्धेचे अवडंबर किती माजवायचे व सत्ता कायम राहावी म्हणून ईश्वरास ‘बळी’ चढवून लाच का द्यावी? इसापने सांगितले ते महत्त्वाचे, ‘‘ईश्वराची भक्ती करावी, ती काळजीपूर्वक, मनापासून आणि पूज्यभाव हृदयात धरून करावी. तिच्यामध्ये ढोंग पिंवा बतावणी यांचा लवलेशही नसावा. देव आणि त्याचे सामर्थ्य म्हणजे केवळ मुलांना घाबरविण्यासाठी कल्पिलेला बागुलबुवा आहे असे समजू नये. देव सत्य, सर्वज्ञ आणि शक्तिमान आहे.’’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या गटाच्या आमदारांना याचा विसर पडलेला दिसतो. इंदिरा गांधी या सगळय़ात जास्त धार्मिक होत्या, तरीही ईश्वर त्यांचा पराभव रोखू शकला नाही. इथे तर चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली व ते आशीर्वाद घ्यायला आसामच्या तीर्थस्थानी पोहोचले.

सरकार इतके बुळचट का?

ठाकरेंनी म्हटले की, पोपट आबाजी जाधव या शेतकऱ्याने नगर जिल्हय़ात आत्महत्या केली. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने त्यांची वीज तोडली. या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केली. अशा अनेक शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. कोणता देव या आत्महत्या थांबवणार. महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार त्यामुळे बुडाला व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जातात, पण गुजरात पिंवा कर्नाटकने महाराष्ट्राच्या बाबतीत जो अन्याय चालवला आहे त्यावर स्वाभिमानी भूमिका घेण्याची हिंमत आज एकाही मंत्र्यात दिसत नाही. सरकार इतके बुळचट का झाले आहे?

बातम्या आणखी आहेत...