आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा इशारा:शिंदे-फडणवीस सरकारची गुंगी हिवाळी अधिवेशनात उतरावी लागेल, महामोर्चामुळे सरकार टरकले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविआचा महामोर्चा ‘फेल’ होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

बेकायदा सरकार कोसळतेय

हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात होत आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मविआच्या महामोर्चामुळे सरकार टरकले आहे. या मोर्चाने मिंधे–फडणवीस सरकारला नोटीस दिली आहे. तुमचा बेकायदा इमला कोसळत आहे.

मोर्चा यशस्वी झाला

महामोर्चा यशस्वी झाला. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळमळून सांगितले की, मोर्चा फेल झाला. याचाच अर्थ मोर्चा भव्य होता, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

अधिवेशनात पडसाद उमटतील

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून उद्योग पळवले जातात, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नी महाराष्ट्राला चपराक मारतात व त्यावर उतारा म्हणून फडणवीस-शिंदे दिल्लीत जाऊन गुंगीचे औषध घेऊन येतात. महाराष्ट्र अशा ‘गुंगारामां’च्या हाती सुरक्षित नाही व या गुंगारामांची झोप उडण्याची चिन्हे दिसत नाहीत, मात्र ती उडवावीच लागेल. मुंबईतील महामोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी निघाला, त्यामुळे त्याचे पडसाद नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटतील.

गुंगाराम सरकारच्या खटपटी

आजच्या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबईतला शनिवारचा महामोर्चा टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून ‘गुंगाराम’ सरकारने नाना खटपटी, लटपटी केल्या. या बेकायदा सरकारने नियम, कायद्यांचे, अटी–शर्तींचे कागदी भेंडोळे नाचवले. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडतच राहतील. नापास, बेकायदा सरकार काय म्हणतेय याकडे लक्ष द्यायची गरज नाही.

देवेंद्र फडणवीसांचा मऱ्हाटी द्वेष

उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असे विराट मोर्चे निघाले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली मराठी जनांच्या न्याय्य हक्कांसाठी इतकेच विराट मोर्चे, उसळते जनसागर महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यानंतर बऱ्याच काळाने मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान जागविण्यासाठी असा मोर्चा निघाला. मराठी माणसाचे संयमी, तितकेच रौद्र रूप या मोर्चाने पाहिले. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे मंडळींनी सांगितले की, “मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा!’’ ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही त्यांच्या डोळ्यांत मऱ्हाटी द्वेषाचा वडस वाढला आहे.

ईव्हीएमची कलाकारी नव्हती

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील महामोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती. लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे सरकार मूकबधिर होऊन बसले आहे. कारण दिल्लीने त्यांना गुंगीचे इंजेक्शन टोचून पाठवले आहे. या गुंगीचा असर ओसरला की, पुढचे इंजेक्शन देऊन सरकारला झोपवून ठेवले जाते. अशा गुंगीने बधिर झालेल्यांच्या पेकाटात लाथ घालून जागे करण्यासाठी मुंबईतील मोर्चा एका त्वेषाने निघाला होता. तेव्हा हा मोर्चा ‘फेल’ होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल.

चंद्रकांत पाटील यांचा प्लॅस्टिकचा मास्क

उद्धव ठाकरे म्हणाले, जनता खवळली आहे हे सरकारने मान्य करायला हवे. काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दलित कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्या कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न करणे वगैरे खतरनाक कलमे लावून सरकारने आपण घाबरलो आहोत हे सिद्धच केले होते. पुन्हा त्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था ‘डबल’ केली. स्वतः चंद्रकांत पाटील हे दुसऱ्या शाईफेकीच्या भयाने चेहऱ्यावर प्लॅस्टिकचा मोठा मास्क लावून फिरत आहेत. राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण समजायचे? मोर्चा फेल झाला असे सांगणाऱ्यांसाठी हा जनतेचा सवाल आहे.

सरकार तुडवले जाईल

उद्धव ठाकरे म्हणाले, महामोर्चाप्रमाणे भविष्यात अशा अनेक पावलांखाली एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार तुडवले जाईल. मोर्चा हत्तीच्या पावलाने चालत होता. महाराष्ट्राचे दुश्मन यापुढे याच हत्तीच्या पायाखाली तुडवले जातील असा रोष जनतेच्या मनात आहे. शिवरायांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे सरकारचे श्रद्धास्थान आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे मंडळी या अपमानकर्त्याच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंह कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती आहे.

जनता विकली जात नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या सरकारात आज सगळे काही आलबेल नाही. चाळीस विरुद्ध एकशे पाच असा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. या संघर्षामुळे राज्याचे प्रशासन हतबल आहे. राज्याच्या विकासाची सूत्रे मर्जीतल्या बिल्डरांच्या व लॅण्ड डीलर्सच्या हाती सोपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळ्याच पद्धतीने कलेक्टरी करीत आहेत. लुटींचा वाटा दिल्लीच्या चरणी अर्पण करून खुर्ची वाचवत आहेत. लुटीचा हिस्सा फुटीर व बेइमानांत वाटला जात आहे. शिवसेना फोडण्यासाठी याच लुटीचा हिस्सा वापरला गेला. अर्थात त्या लुटीने दलाल, ठेकेदार तुमच्या गळास लागले, पण जनता खोक्याने विकली जात नाही.

बातम्या आणखी आहेत...