आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा अन् टोला:म्हणाले -भाजपचा विजय ऐतिहासिक, पण महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही फळले असावेत

मुंबई | सलमान शेख4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "गुजरातमधील विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे" असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या.

आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यात गुजरातमध्ये भाजपचा तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. सर्व विजयी उमेदवारांना ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपला लगावला टोला

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना भाजपला टोला देखील लगावला आहे. "गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.

पंतप्रधान मोदी हे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे देखील स्पष्ट झाले आहे. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते", असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टोल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरे यांच्या जवळ एक अस्त्र आहे ते म्हणजे टोमणे अस्त्र. उद्धव ठाकरे यांना आता उद्योग कळायला लागले, रिफायनरी प्रकल्प त्यांनी घालावले, टोमणे मारल्याशिवाय त्यांना काहीच जमत नाही. महाराष्ट्रातील उद्योग घालवणारे ठाकरेच आहेत. आता त्यांना उद्योगाचे महत्व त्यांना कळत आहे. त्यांनी रिफायनरीचा उद्योग महाराष्ट्राबाहेर घालवला. महाराष्ट्रात जे काही घडले त्याचा परिणाम त्यांच्या मनावर दिसत आहे. हिमाचल प्रदेशात अपेक्षित यश भाजपला मिळाले नाही. तिथे 42 टक्के भाजपला मते मिळाली, असे फडणवीस म्हणाले.

आपची ताकद दिल्लीपुरती

पुढे फडणवीस म्हणाले की, गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विश्वास टाकला. आम्हाला तेथे 52 टक्के मते मिळाली. कधी नव्हे एवढा मानहाणीकारक पराभव काँग्रेसचा झाला. आम आदमी पक्षाची ताकद दिल्लीपुरतीच असून अरविंद केजरीवाल केवळ दिल्लीचेच नेते आहेत असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.

आता तरी निवडणुका घ्या

"आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घ्या, घाबरण्याची काय गरज आहे, राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकदा लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ द्या" असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला निवडणुकीसाठी आव्हान दिले आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

दोघांचे अभिनंदन

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, लोकशाहीमध्ये एका राज्यात एक पक्ष तर दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष विजयी झाला आहे. जे -जे उमेदवार विजयी झालेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता महाराष्ट्राची निवडणूक व्हायला हवी, कारण राज्यात घटनाबाह्य सरकार बसले आहे. भाजपला एवढा मोठा विजय प्राप्त झाला नंतर आता महाराष्ट्राच्या निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...