आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री?, देवेंद्र फडणवीस फडतूस गृहमंत्री, झेपत नसेल तर राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले होते. त्याची प्रचिती काल ठाण्यात आली, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात अमानुष मारहाण करण्यात आली. त्यावरुन आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

फडणवीस लाचार, लाळघोटे

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. लाचार, लाळघोटे करणारे, नुसते फडणवीसी करणारा माणुस गृहमंत्रीपद मिरवतोय. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायचे. जिवाला जीव लावणारे, महिलांचे संरक्षण करणारे, आनंद दिघेंचे ठाणे, अशी ठाण्याची सुसंस्कृत ओळख होती. मात्र, आता गुंडांचे ठाणे, अशी ठाण्याची ओळख होत आहे. ठाण्यात महिलांचीही गँग तयार केली जातेय का? महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती.

एकनाथ शिंदे गुंडांचे मंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री? असा प्रश्न आता पडला आहे. एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत. मनात आणल तर आता या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून या गुंडांची गुंडगिरी आम्ही उखडून फेकून देऊ शकतो. राज्य सरकार नपुंसक असेल. मात्र, शिवसैनिक हा नपुंसक नाही. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. मात्र, महिलांवर हल्ला करणारे हे नपुंसक आहेत.

रोशनी शिंदेंच्या पोटात लाथा मारल्या

उद्धव ठाकरे म्हणाले, रोशनी शिंदे यांनी एकनाथ शिंदेंबद्दल काही पोस्ट टाकली म्हणून त्यांना निर्घृण मारहाण करण्यात आली. गुंडांनी आधी त्यांना व्हिडिओद्वारे माफी मागायला लावली. रोशनी शिंदे यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या पोटात निर्घृणपणे लाथा मारण्यात आल्या. रोशनी शिंदे या गर्भधारणेसाठी उपचार करत आहेत. त्यामुळे पोटात मारू नका, अशी विनवणी त्यांनी केली. त्यानंतरही गुंडांनी दयामाया न दाखवता मारहाण केली.

ठाण्याचे पोलिस आयुक्त बिनकामाचे

उद्धव ठाकरे म्हणाले, याप्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी आयुक्तालयात गेलो तर तेथे आयुक्तच उपस्थित नाहीयेत. असे बिनकामाचे आयुक्त काय कामाचे? यापूर्वी ठाण्यातच एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात हे असे शोभते का? पोलिस दबावाखाली आहेत का? गृहमंत्र्यांना थोडी जरी लाज, लज्जा, शरम असेल तर त्यांनी ताबडतोब अशा बिनकामाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.

जेलयात्रा करावी लागेल

उद्धव ठाकरे म्हणाले, हे गुंड लोक सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा करत आहेत. मात्र, त्यांना आता जेलयात्रा करावीच लागणार आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांना सरकारने तातडीने अटक करावी किंवा सत्तेतून बाहेर पडावे.

संबंधित वृत्त

गुंडाराज:ठाकरे कुटुंबीय जखमी रोशनी शिंदेंच्या भेटीला, मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर 30 जणांचा तलवारीने हल्ला

हाराष्ट्रात गुंडाराज आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महिलेवर सध्या ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आज संपदा रुग्णालयात जात जखमी महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांची भेट घेतली. भेटीत उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. वाचा सविस्तर