आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगाम बोलण्यावर बंदी हवी:प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा दाखला दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रकांत पाटील यांनी कालच उद्धव ठाकरेंना प्रबोधनकारांचे पुस्तक भेट दिले होते.

शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. यावर शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

विशेष म्हणजे कालच भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंशी भेट घेतली होती. आपल्या 'भीक मागणे' या वक्तव्याच्या समर्थनार्थ चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचे 'माझी जीवनगाथा' हे पुस्तक भेट दिले होते. या पुस्तकात 'एखाद्या कार्यासाठी दान मागणे म्हणजे भीक मागणे', असा उल्लेख प्रबोधनकारांनी केल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. तरीही आज उद्धव ठाकरेंकडून शेलक्या शब्दांत यावर टीका करण्यात आली आहे.

शाईफेक होणे चुकीचे, पण...

उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र शाईफेक करणे हे जसे चुकीचे आहे, तसेच विधिमंडळाच्या आवारात शाईचे पेन आणण्यावर बंदी घालणे हेदेखील चुकीचेच. लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि जनतेची मने जिंकणे अपेक्षित असते. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसते आहे काय?

श्रद्धास्थानांवर आघात

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारचे वर्तन जनतेला सुखावणारे असायला हवे. पण, जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार वा सत्तापक्षाच्या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात सुरू केले. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे.

बेलगाम बोलण्यावर बंदी हवी

उद्धव ठाकरे म्हणाले शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱया पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी. महाराष्ट्रात वाचाळवीर मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी तोंडाचा पट्टा सैल सोडून जो काही मैला गेल्या काही दिवसांत बाहेर फेकला, त्यामुळेच महाराष्ट्राचे वातावरण कलुषित व प्रदूषित झाले हे नाकारता येईल काय? हवाबाण सोडून सामाजिक वातावरण बिघडवण्यात खास करून भाजपचे पुढारी आघाडीवर आहेत व त्यातूनच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यात घडला.

सरकार अधिकच बिथरले

उद्धव ठाकरे म्हणाले, शाईफेकीच्या घटनेपासून राज्यातील मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांविषयी अपमानास्पद विधान केल्यामुळे राज्यात संतापाचा भडका उडाला. भाज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला. प्रसाद लाड यांनीही अशीच बडबड केली. सरकार पक्षानेच महाराष्ट्रातील महापुरुषांची निंदानालस्ती करून महाराष्ट्राची बदनामी चालवल्याने मराठी अस्मिता दुखावली.

शाई म्हणजे एके-47

आजच्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. भाजप नेते व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मध्यंतरी पुण्यामध्ये जी शाईफेक झाली त्याचा मिंधे सरकारने भयंकर धसका घेतला. शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा हा निर्णय हास्यास्पदच म्हणावा लागेल. लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-47 बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजप पुढारी व मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे.

बातम्या आणखी आहेत...