आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार-मुख्यमंत्री भेट:सरकारकडे बहुमत आहे; विधानसभा अध्यक्ष निवड या अधिवेशनातच घ्या : पवार यांची उद्धव ठाकरे यांना दिलासावजा सूचना

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा अध्यक्षाची निवड या पावसाळी अधिवेशनात घ्या. सरकारकडे बहुमत आहे, घाबरण्याचे कारण नाही, अशी दिलासावजा सूचना महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दोन तास पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यात विधानसभा अध्यक्षपद निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री आणि सत्ताधारी अाघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तणावाचे प्रसंग उद्भवले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत पवार आणि ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे भेट महत्त्वाची मानली जाते. आघाडीतील वाटप सूत्रानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्यास आहे. मात्र नाना पटोले यांनी मध्यंतरी राजीनामा दिला. त्यामुळे ते पद रिक्त आहे. गेली दोन अधिवेशने उपाध्यक्षांनी अधिवेशने पार पाडली आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ५ जुलैपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात अध्यक्ष निवड हवी आहे. मात्र काँग्रेसने निवडीची परस्पर घोषणा करून टाकली. त्यामुळे मुख्यमंत्री दुखावले आहेत. दोन दिवसांचे अधिवेशन आहे. कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष निवडीची घाई नको, असा मुख्यमंत्र्यांचा सूर आहे. काँग्रेसचा मात्र आग्रह आहे. आपल्याकडे बहुमतही आहे. काळजीचे कारण नाही, अध्यक्ष निवड घ्या. काँग्रेस व्यक्ती निवडेल. त्यावर सहमतीने निर्णय घ्या, असे पवार म्हणाल्याचे समजते.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात सेवाविवृत्त पोलिस कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक होती. मध्यतंरी मुख्यमंत्र्यांनी कर्करोग रुग्णांच्या नातेवाइकांच्या निवासस्थानाबाबतचा गृहनिर्माण विभागाचा निर्णय फिरवला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी होती. अखेर शरद पवार यांच्या सूचनेनुसार बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत मंत्र्यांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा निर्णय झाला.

- ५ आणि ६ जुलै असे दोनच दिवस यंदाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यादरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवड करायचे मंगळवारी निश्चित झाले. आवश्यकता भासल्यास एक-दोन दिवस अधिवेशन कालावधी वाढवण्यात येईल.

- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल. संभाव्य अध्यक्षपदाचा उमेदवार अधिवेशनाच्या दोन दिवस आधी पक्ष निश्चित करेल, अशी माहिती काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

- काँग्रेसमध्ये नितीन राऊत, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर. के.सी. पाडवी या नेत्यांची नावे सध्या विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...