आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 जानेवारीला राज्याचे राजकारण तापणार:शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच ठाकरे-शिंदे-फडणवीस एका व्यासपीठावर येण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. उद्धव यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले, तर सध्याच्या कडाक्याच्या थंडीत राज्याचे राजकारण तापणार हे नक्की.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असेही शिंदे गटाने म्हणायला सुरु केले. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे त्यांच्यातील दरी वाढतच गेली.

तैलचित्र अनावरण समारंभ

नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे हे तीन नेते अजूनपर्यंत समोरासमोर आलेले नाहीत. 23 जानेवारीला विधान भवनात बसवण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभास प्रसिद्ध सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.

तर तिघे नेते एकत्रित दिसतील

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणारच आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर ठाकरेंनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले तर तिघे नेते एकत्रित दिसतील.

तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार?

उद्धव ठाकरे जर या कार्यक्रमाला आले तर सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांना सोबत पाहण्याचा दुर्मिळ योग जुळून येणार आहे. तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? ते एकमेकांशी संवाद साधतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दृष्टीने 23 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...