आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे:शपथ घेऊन सांगतो 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, जात धर्म विसरून देशभक्तांनी एकत्र यावं

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयादशमीच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाच्या माध्यमातून थेट शिंदे गट आणि भाजपच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. खोकेसूर म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी अत्यंत परखडपणे मुद्दे मांडले...

ते गद्दारच, गद्दारच म्हणणार तुमच्या बुडाला चिकटलेली मंत्रीपदे ही काही काळासाठी आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. ज्यांनी हे कार्य सोपवले आहे, तो बघून घेईल. इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासची बोली लावून आणलेला नाही. येथे वृद्ध, दिव्यांग आणि गावाकडून आलेली मंडळी आहेत. माझ्यासमोर बसलेले एकनिष्ठ आहेत. शिवाजी पार्कवरले प्रेम ओरबाडून घेता येणार नाही. हे माझ्या शिवसैनिकांचे प्रेम आहे. मला अजूनही डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही. मात्र, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जावूच शकत नाही.

दरवर्षी मेळाव्याप्रमाणे रावण दहन पण, यावर्षी रावण वेगळा. आतापर्यंतचा रावण हा दहातोंडाचा होता. आता तो पन्नास खोक्यांचा झाला आहे. आता तो खोकासूर आहे. धोकासूर आहे. आता वाईट आणि संताप एका गोष्टीचा येतो. जेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा कटप्पा हे कट करत होते. हा पुन्हा उभाच राहू शकणार नाही, यासाठी कट सुरू होते. तुम्ही पंगा घेतलेला आहे. देव तुमचे भले करो. पण तेजाचा शाप असतो. हा माझ्या तेजाचा शाप आहे. ज्यांना सर्व काही दिले. त्यांनी गद्दारी केली. ज्यांना दिले नाही, ते माझ्यासोबत आहेत.

अमित शाह जे बोलले की, आमचे असे काही ठरलेच नव्हते. मी आज शिवरायांच्या साक्षीने माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसेच ठरले होते. भाजपा आणि शिवसेनेचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटू घ्यायचे ठरले होते.

माणसाची हाव किती? शिवसेना प्रमुख व्हायचे आहे. शिवसेना प्रमुख स्विकारणार का तुम्ही. बाप चोरणारी ही औलाद, स्वताच्या वडिलांच्या नावाने मते मागा. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटे कार्ट माझ्या पोटी जन्माला आले. जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचे नाव लावतेय. आनंद दिघेंना जाऊन 20 वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही. पुष्पा आला होता ना.. झुकेगा नहीं साला.. आणि हे म्हणतात उठेगा नहीं साला. एक बार झुकेगा तो उठेगाच नही.. आता यांच्या सरकारला 100 दिवस होतायत. त्यातले 90 दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ.

देवेंद्र फडणवीस यांना कायदा चांगला कळतो. हा टोमणा मी मारला नाही. ते सभ्य गृहस्थ आहेत. ते म्हणात की मी नुसते टोमणे मारतो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुन्हा येईन असे म्हणाले होते. त्यानंतर दिडदिवस आले आणि विसर्जन झाले. आता मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरं बोलतोय. मी कुठे टोमणा मारतोय. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार. कुणी गोळीबार करतो, कुणी चुन चुन के मारेंगेची भाषा करतो. तुम्ही कुठल्या पद्धतीने कायदा चालवताय? जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा.

मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडले? का मिंधे गटाने नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितले की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितले मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकले नाही. आता मुसलमानांनी सांगितले की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचे राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले. कुठले धागेदोरे कशाशी जोडतात. आम्ही भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले नाही. आम्ही मरू तेव्हाही हिंदूच असणार. पण भाजपाने आमच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवायचे का? कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचे की हे थडगे बघा कसे सजवले. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोके टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचे का? नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता? तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत. आरएसएसच्या होसबाळेंनी भाजपाला आरसा दाखवला आहे. त्यात काहीतरी सुधारणा होईल अशी आशा आहे. नाहीतर स्वत:च भांग पाडत बसतील.

अकिंता भंडारी या कोवळ्या मुलीचा खून भाजपच्या एका नेत्याच्या रिसॉर्टवर झाला. त्या मुलीची आई न्याय मागत आहेत. बिलकिस बानोवर बलात्कार झाला. तिच्या मुलीचा आपटून खून केला. आरोपी पकडले. शिक्षा भोगत होते. त्यांना गुजरात सरकारने सोडून दिले. मात्र, गावी गेल्यानंतर त्यांचा सत्कार करून स्वागत केले. जी शिकवण शिवरायांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराची खणानारळाने ओटी भरणारे शिवराय. हे शिकवण देणारे आमचे हिंदुत्व आहे.चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावे. त्यांनी त्यांचे हिंदुत्व सांगावे, मी माझे वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंे की आमचे हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडले गेलेले आहे. जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा. घराबाहेर पाय ठेवला तर हा देश हाच आमचा धर्म पण जर कुणी त्याच्या धर्माची मस्ती आमच्यासमोर करायला लागला, तर आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहू. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी.

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये. नुसते या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवा. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसे आहोत. मी आज त्यांना आव्हान देतोय की आम्हाला जमीन बघायचीच आहे. आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा. हिंमत असेल तर ती एक फूट जमीन जिंकून दाखवा.

आज देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.

मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपाने पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडले म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसे जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव केले नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवले आहे. शेतकरी कर्जमुक्त केले. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. एकाअर्थी झाले, तर बरे झाले. बांडगुळे ही सर्व छाटली गेली. बांडगुळाची मुळे ही फांद्यामध्ये असतात. पण झाडाची मुळे ही जमिनीत असतात. त्यांना स्व:ताची मुळे नाहीत. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. आता अंगावर आला आहात. तर आता त्यांना शिंगावर घ्यावे लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पराभूत करावे लागेल. शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून आलेली संकट बघत मी मोठा झालो आहे. माझ्यासोबत चालायचे असेल तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी पाहिजे. तुमच्या मनातील आगीतून वनवा पेटणार आहे. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.

बातम्या आणखी आहेत...