आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे समीकरण:आघाडीने भाजपविरुद्ध फुंकले रणशिंग; केंद्र सरकारच्या कारभारावर हल्ले, उद्धव ठाकरे-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्यात चर्चा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. यानंतर ते म्हणाले, आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरवली आहे. तसेच भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांचे नेते लवकरच हैदराबाद येथे भेटणार असून देशाचा कारभार सुधारण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचा दोघांनी दावा केला. बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशात दिवसागणिक राजकारण गढूळ होत चालले आहे. राज्यकारभार दूर राहिला, सुडाचे राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. ही या देशाची परंपरा नाही आणि हे आमचे हिंदुत्वही नाही. मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा जो प्रकार सुरू आहे ताे मोडायला पाहिजे. आम्ही दिशा ठरवली असून त्या दिशेने प्रयत्न करणार आहोत.

समविचारी पक्षांची लवकरच बैठक; शरद पवार-के. सी. राव भेटीतील फलनिष्पत्ती!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. या वेळी पवार यांनी बैठकीत केवळ विकासावर चर्चा झाल्याचे सांगितले, तर राव यांनी समविचारी पक्षांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचे सांगितल्याने भाजपविरोधी आघाडीचीच चर्चा या भेटीत झाल्याचे स्पष्ट झाले.

दोघा नेत्यांमध्ये पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दीड तास चर्चा झाली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते. दुसरीकडे यांची मुलगी आणि आमदार के कविता आणि पक्षाचे खासदार जे संतोष कुमार, रणजित रेड्डी आणि बी बी पाटील, अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.

बैठकीनंतर पवार म्हणाले की, देशात बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नांवर आमची चर्चा झाली. तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली पावले उचलत देशाला एक मार्ग दाखवला आहे, असे पवार म्हणाले.

अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचे : के. सी. राव
महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचे आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचे आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या वेळी केला. केसीआर पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत झाले. यापुढे देशाच्या विकासासाठी, देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी एकजूट प्रयत्न करणार आहोत.

सर्व एकत्र भेटणार
पुढील काळात एकत्र काम करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. देशात असे अनेक लोक आहेत जे आमच्यासारखा विचार करतात. त्या लोकांसोबत देखील माझी चर्चा सुरू आहे. काहीं दिवसातच हैदराबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्रित भेटू आणि चर्चा करून एक मार्ग ठरवू, असेही राव यांनी नमूद क़ेले.

हैदराबाद भेटीचे निमंत्रण
मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी भावना यावेळी केसीआर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार श्रीमती के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता.

आम्ही सख्खे शेजारी... : महाराष्ट्र व तेलंगणाची हजारो किमीची सीमारेषा एक आहे. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यांत एक चांगले वातावरण राहायला हवे. राज्य गेले खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात हे राजकारण परवडणार नाही. नव्या विचारांची सुरुवात झाली आहे, आकार यायला थोडा अवधी लागेल, मेहनत करावी लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...