आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शिंदे आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात असतानाच ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून या दोन्ही गटात आज पुन्हा राडा झाला. दोन्ही गट आमने - सामने आले असून सुमारे अर्धा ते एक तासांपासून हा राडा सुरू आहे. ठाण्यातील शिवाईनगर परिसरातील शाखेवर शिंदे गट आपला हक्क सांगत आहे याच मुद्द्यावरुन पुन्हा दोन्ही गटात वादंग सुरू झाले आहे.
पोलिस बंदोबस्त तैनात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात राडा झाला. ठाण्यातील शिवाई नगर परिसरात शिवसेनेची शाखा आहे. ती ताब्यात घेण्यावरून दोन्ही आमने-सामने आल्याने तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यापूर्वीही वाद
शिवाई नगरच्या शाखेवरून ठिणगी उडण्याआधी काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातील शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गटांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा राडा झाल्याने ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष थांबत नसल्याचे दिसून येते.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेचे कुलुप तोडले
ठाण्यातील शिवाई नगर इथल्या शिवसेना शाखेजवळ संध्याकाळी आठच्या सुमारास एका कार्यक्रमानिमित्ताने शिंदे गटाचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्याबरोबर माजी महापौर नरेश म्हस्के हेही होते. त्यावेळी शिवाईनगर शिवसेना शाखेचे कुलुप तोडून नरेश म्हस्के आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेत प्रवेश केला आणि शाखेचा दरवाजा आतून बंद केला.
ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते पोहचले
शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्याच्या हालचाली समजताच ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शाखेसमोर दाखल झाले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांचा अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
हौस असेल तर दुसरी शाखा बांधा - नरेश म्हस्के
शिवाईनगर शाखा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. येथील सर्व कामे प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात सुरु असतात, असे असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केला आहे. शिवाईनगरचे नगरसवेक आमच्याबरोबर आहेत, यांना हौस असेल तर त्यांनी दुसरं कार्यालय थाटावे. ही शाखा आमची आहे, आम्ही त्यांची कोणतीही प्रॉपर्टी हडप केलेली नाही, शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता आहे, आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे त्यामुळे यावर आमचाच हक्क आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.