आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगल्या शब्दांत सांगूनही राज्यपालांना हटवले जात नसेल तर आता महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र बंदचे संकेत दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आता सर्व महाराष्ट्रप्रेमी, शिवरायप्रेमी एकत्र येत आहेत. आम्ही लवकरच राज्यपालांना हटवण्यासाठी कार्यक्रम जाहीर करू.
संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
उदयनराजेंना धन्यवाद
उद्धव ठाकरे म्हणाले, खासदार उदयनराजेंनी आज जी काही भूमिका मांडली त्याबाबत मी त्यांना धन्यवाद देईल. भाजपमधील शिवरायप्रेमीही आता राज्यपालांविरोधात बोलत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आम्ही चांगल्या शब्दांत सांगूनही राज्यपाल बदलले जात नसतील. भाजप राज्यपालांना पाठीशीच घालत असेल तर आता त्यांना महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे.
सर्वांनी एकत्र येणे गरजेचे
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपालांना हटवण्यासाठी आम्ही सरकारला एक अवधी दिला होता. घाईघाईत निर्णय नको, अशी आमची भूमिका होती. या काळात बदल होणे अपेक्षित होते. मात्र, ते झाले नाही. त्यामुळे सर्व शिवरायप्रेमींशी चर्चा करून आता आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. मविआ नेत्यांशीही याबाबत बोलणे झाले आहे. महाराष्ट्र बंद किंवा असाच काही कार्यक्रम करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लवकरच एक ठोस कार्यक्रम जाहीर करू.
दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्यता
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांच्याकडून आता अभिमान, स्वाभिमानाची अपेक्षा नाही. एकीकडे कर्नाटक महाराष्ट्रातील गावातील पाणी सोडून ते गाव घशात घालण्याचा डाव रचतोय. तर, दुसरीकडे, आपले मिंधे सरकार मात्र, सत्तेच्या पाण्यातच गंटागळ्या खात आहे.
बिनडोक माणसं राज्यपाल पदावर नको
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. त्यामुळेच आता यापुढे राज्यपालांची नियुक्ती कोणत्या आधारावर, निकषावर केली पाहीजे, हे निकष ठरवले पाहीजे. केवळ माझ्या मर्जीतला आहे म्हणून कोणताही बिनडोक माणूस या पदावर बसवणे, यापुढे चालणार नाही. राज्यपाल हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्यावर त्या दर्जाची माणस हवीत.
कर्नाटकविरोधात मुख्यमंत्री गप्प का?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत कर्नाटक भवन बांधताय. बेळगावमध्ये येऊ नका, असे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना पाठवताय. मात्र, याविरोधात आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा उच्चारत नाहीत. अद्याप मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राला मिंधे सरकारची फळ भोगावी लागत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.