आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद असणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील राजकारण तापले आहे. विविध पक्षांकडून याचा निषेध सुरु आहे.
राज्यपाल कोश्यारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले की, 'कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोक येथून गेल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही.'
भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी मुंबईतील दाऊद बाग जंक्शन चौकाचे नामकरण व उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सर्व स्तरातून कोश्यारींचा निषेध
राज्यपालांच्या या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध सुरु झाला आहे. आता विरोधकांसोबतच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे राज्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तसेच आत्तापर्यंत खासदार सुप्रिया सुळे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, उद्य सामंत, अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर टीका करत चांगलेच धारेवर धरले आहे.
ठाकरेंकडे सर्वांचे लक्ष
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता आपल्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आहेत. आत्तापर्यंत ठाकरे सरकार असताना आणि त्यानंतर ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही कोश्यारी आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.