आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा कसोटी; निकषात बसणारे पात्र उमेदवार शोधण्याकडे कल

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसाळी अधिवेशनापूर्वी करण्यात येणार शिफारस, तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी ४ जागा

विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त  १२ आमदारांच्या निवडीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. राजभवनने काही त्रुटी काढू नयेत म्हणून निकषात बसणाऱ्या पात्र उमेदवारांची शिफारस करण्याकडे सत्ताधारी तिन्ही पक्षांचा कल असणार आहे. ७८ सदस्यांच्या ज्येष्ठ सभागृहात सध्या १० जागा रिक्त आहेत, तर २ जागांची १५ जूनला मुदत संपणार आहे. या सर्व १२ जागा कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातील सदस्यांसाठी आहेत. यापूर्वी राज्यपाल नामनियुक्तचे सलग दोन प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्य केले नाहीत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी १२ जागांच्या शिफारशींसाठी  निकषात बसणाऱ्या सदस्यांचा शोध घेतला जात आहे. इतर निवडणुकीवेळी काँग्रेस इच्छुकांचे अर्ज मागवते, पण नामनियुक्तसाठी मागवले जात नाहीत, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी म्हणाले. दरम्यान,  नामनियुक्त सदस्यांच्या शिफारशीसंदर्भात राज्यपाल यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. 

काँग्रेस-राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी  

काँग्रेसमध्ये माणिकराव ठाकरेंपासून सचिन सावंतांपर्यंत इच्छुकांची गर्दी आहे. राष्ट्रवादीमध्ये रूपाली चाकणकर, राजन पाटील, सुषमा अंधारे, महेश तपासे, नजीब मुल्ला यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेमध्ये यासंदर्भात अद्याप चर्चा नाही. सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये समसमान   चार जागा घेण्याचे सूत्र आहे. मात्र  काँग्रेसकडून अधिकच्या एका जागेची मागणी होऊ शकते. 

१ लेखकास कोणतीही राजकीय भूमिका नसेल तर कोणताही राजकीय पक्ष त्यांना आमदार म्हणून का शिफारस करेल, असे वात्रटिकाकार व विधान परिषदेचे माजी सदस्य रामदास फुटाणे म्हणाले. 

२ तज्ञ, अनुभवी व्यक्तींअभावी १९८४ मध्ये नामनियुक्तच्या ९ जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वरिष्ठ  सभागृहातील २३ % सदस्य सत्तेत अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा एका अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

३. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ खंड ५ (३) नुसार साहित्य, कला, सहकार, समाजसेवा आणि विज्ञान या क्षेत्रात सहभाग किंवा व्यावहारिक अनुभव असणारी व्यक्ती नामनियुक्तसाठी पात्र आहे. एकूण १२ जागांमध्ये ५ कोणत्या गटांतील व्यक्ती असाव्यात याचे काहीही बंधन नाही.

बातम्या आणखी आहेत...