आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत अनिश्चितता आणि संभ्रम कायम आहे. बुधवारी खडसे मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु उभय नेत्यांची भेट झाली नाही. दरम्यान, खडसे यांच्यासोबत माझी आज भेट ठरली नव्हती, त्यामुळे त्यांच्याशी भेट होण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशावर मौन बाळगले.
एकनाथ खडसे हे बुधवारी शरद पवार यांना मुंबईत भेटणार आहेत. उभय नेत्यांची ही भेट खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंदर्भात निर्णायक असल्याच्या मोठ्या चर्चा होत्या. यासंदर्भात पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांनी विचारले असता, आमच्या भेटीचे नियोजन नव्हते. त्यामुळे भेट घेण्याचा प्रश्न नाही. उद्या मी दिल्लीत असणार आहे, असे उत्तर पवार यांनी दिले. दरम्यान, रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज खडसे यांना रिपाइंमध्ये येण्याचे आवाहन केले. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत आता मंत्रिपद मिळणार नाही, त्यापेक्षा त्यांनी रिपाइंमध्ये यावे, असे आठवले म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व लोकप्रतिनिधींशी यासंदर्भात स्वत: पवार यांनी मुंबईत चर्चा केली होती. खडसे यांना पक्षात प्रवेश दिल्यास जिल्ह्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा त्यांनी अंदाज घेतला होता. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून केवळ ११ महिन्यांत खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
भाजपच्या बैठकीला खडसे उपस्थित राहणार : भंडारी
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंदर्भात भाजपच्या पत्रकार परिषदेत विचारणा झाली. भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार (दि. ८) रोजी ठेवण्यात आली आहे. दादर येथील वसंत स्मृती येथे ही बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या बैठकीला खडसे उपस्थित राहणार आहेत, असे उत्तर प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.