आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींचा संताप:राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची गडकरींची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत दिले चौकशीचे आदेश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना नितीन गडकरींनी दोन पानी पत्र लिहिले आहे. त्यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे असे म्हणत गडकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्काळ दखल घेतली दखल
नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या पोलिस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यात त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धमक्या देत महामार्गांची कामे बंद पाडणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गडकरींनी पत्रात काय लिहिले?

  1. अकोला आणि नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
  2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.
  3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
  4. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
  5. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.
बातम्या आणखी आहेत...