आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध शिथिल होणार:पुढील आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक, सर्व कारभार 24 तास उघडे ठेवू, पण गर्दी टाळा-मास्क घाला; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना निर्बंधांमुळे बंद असेलेली हाॅटेल, माॅल आणि प्रार्थनास्थळे टप्प्याटप्प्याने उघडण्यास येत्या आठ ते दहा दिवसांत परवानगी देण्यात येईल तसेच आपण सर्व कारभार २४ तास उघडे ठेवू, पण गर्दी टाळा आणि मास्क घाला, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, उद्या (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. ज्या जिल्ह्यात जुलै महिन्यात पूर येऊन गेला त्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तसेच अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांतील नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक बाधित झाले असून तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने राज्य शासनाने तयारी केल्याचे स्पष्ट केले.

राज्यात सध्या ११ जिल्ह्यात कोरोना निर्बंध कायम असून २५ जिल्हे निर्बंधमुक्त आहेत. मात्र निर्बंधमुक्त जिल्ह्यांतही हाॅटेल, माॅल, प्रार्थनास्थळे अजूनही बंदच आहेत. निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची मोठी मागणी आहे. त्यामुळे काही अटींवर परवानगी देण्यात येईल. परंतु कोरोनाचे नियम पाळायला हवेत. मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. उद्योजक, ऑफिसेस सगळ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेची विभागणी करा. आपल्याला काम बंद करायचं नाही. आपण आपले सर्व कारभार २४ तास उघडे ठेवू. पण कामाच्या वेळा, त्यांची विभागणी करा गर्दी टाळा. गर्दी वाढली तर रुग्णवाढीची शक्यता असते, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुंबईत १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा
ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, अशा सामान्य प्रवाशांना १५ आॅगस्टपासून मुंबई उपनगरीय रेल्वेेगाड्यांत प्रवासाला मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी एक अॅप बनवण्यात आले असून त्यावर नागरिकांना नोंदणी करावी लागेल. मुंबईत सध्या दोन डोस घेतलेले १९ लाख नागरिक आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी
५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची पंतप्रधानांना विनंती केली असून याबाबत अद्याप केंद्राची भूमिका स्पष्ट नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत, परंतु आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळणे शक्य नाही,असे मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे इंपेरिकल डेटाची मागणी केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

तिसऱ्या लाटेची तयारी
4.5 लाख विलगीकरण खाटा
34 हजार 507 खाटा अतिदक्षता
13 हजार 500 व्हेंटिलेटर्स
600 प्रयोगशाळा राज्यात

बातम्या आणखी आहेत...