आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशी चर्चा होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे, कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल', अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल'.
45 वर्षीय ऊर्मिलाने सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मध्य मुंबईतून तिने लोकसभा लढवली. मात्र तिचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसमधील हेव्यादाव्यास वैतागून तिने सहा महिन्यांत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त म्हणून ऊर्मिलाची शिवसेनेने मागच्या महिन्यात शिफारस केली आहे. मात्र, राज्यपाल यांनी अद्याप या यादीस संमती दिलेली नाही. तत्पूर्वी ऊर्मिलाने शिवसेनेचा भगवा हाती घेण्यास होकार दिला आहे. रविवारपर्यंत ऊर्मिलाचा सेनेत प्रवेश होईल, अशी माहिती एका सेना नेत्याने ‘दिव्य मराठी’स दिली होती. मात्र उद्याच उर्मिलाचा सेनेत प्रवेश होणार असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.