आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महिला आयोग अध्यक्षपदाच्या शर्यतीत उषा दराडे, आशा मिरगे; अजित पवार यांनी घेतली बैठक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेले २० महिने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राज्य महिला आयोगावर अध्यक्ष नेमता आलेला नाही. पण, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बैठक घेऊन चाचपणी केली.

राज्यात आयोग, महामंडळे व प्राधिकरणे यांची संख्या ५८ इतकी आहे. त्यातील बहुतांश महामंडळांच्या नियुक्त्या प्रलंबितच आहेत. मात्र मध्यंतरी मुंबईत साकीनाका येथे निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण घडले. त्यानंतर विराेधी पक्षाने महिला आयोगाचे पद रिक्त ठेवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे मोठी झोड उठवली होती. आता महिला आयोगातील रिक्त पदे भरण्याचा सरकारचा मानस आहे. आघाडीतील ज्या घटक पक्षाकडे जे मंत्रालय असेल त्याच्या अधिपत्याखालील महामंडळ व प्राधिकरण इतर पक्षाला देण्यात येईल, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महिला व बालकविकास मंत्रालय काँग्रेसकडे आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

राष्ट्रवादीत सध्या पाच मुंबईतील माजी आमदार विद्या चव्हाण, निवृत्त सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार, राष्ट्रवादीच्या विद्यमान महिला आघाडी प्रमुख रूपाली चाकणकर, विदर्भातील पक्षाच्या नेत्या डाॅ. आशा मिरगे आणि मराठवाड्यातील नेत्या व माजी आमदार उषा दराडे अशी ५ नावे चर्चेत आहेत. चंद्रा अय्यंगार या महिला व बालविकास विभागाच्या सचिव होत्या. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्या स्नुषेने छळाचा गुन्हा नोंदवलेला आहे. त्यामुळे चव्हाण यांचे नाव मागे पडले आहे. एक व्यक्ती एक पद या भूमिकेमुळे महिला आघाडीच्या अध्यक्षा व पिंपरी-चिंचवडच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे नावही स्पर्धेतून बाद झाल्याचे समजते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता डाॅ. विदर्भातील आशा मिरगे आणि मराठवाड्याच्या उषा दराडे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

त्यावर अजित पवार यांनी चर्चा केल्याचे समजते. डाॅ. आशा मिरगे या विदर्भातील आहेत. २०१४ च्या आघाडी सरकारात त्यांनी महिला आयोगावर सदस्य म्हणून काम केलेले आहे. मात्र शक्ती मिल बलात्कार प्रकरण आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणी मिरगे यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती. उषा दराडे या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांच्या गाठीशी विधान परिषदेतील कामकाजाचा अनुभव आहे तसेच पक्षाचे उपाध्यक्षपद आणि महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...