आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा पानाचे जनक वि.वि. करमरकर यांचे निधन:दैनिकांच्या जगात पहिला प्रयोग करणारा खेळाडूंचा मार्गदर्शक हरपला

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी वृत्तपत्रात क्रीडा पान सुरू करणारे माजी संपादक आणि देशी विदेशी खेळांना मानाचे स्थान देणारे वि वि करमरकर यांचे आज सकाळी मुंबईतील अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीउा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यांनी पूर्ण केली. 1962 मध्ये महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा. भ. कर्णिक संपादक असलेलया या दैनिकात सुरूवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडाविश्वातील बातम्या येत असत.

दैनिकांच्या जगातील पहिला प्रयोग

करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने खेळांच्या बातम्यांना पूर्ण पान मिळाले. दैनिकांच्या जगातील हा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाला वाचकांनी आणि खेळांची आवड असणाऱ्या खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर इतर दैनिकांनीही खेळांच्या बातम्यांसाठी पूर्ण पान देण्याचा निर्णय घेतला. परिणामी खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांसाठी पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले.

खेळाडूंच्या पलिकडचा कॅनव्हास

क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी स्वतः दिवसाचे अनेक तास खर्च करत इतरांसमोर ठेवला. यामुळे करमरकर यांच्या लेखणीला धार होती. प्रसंगी कौतुक करताना त्यांची लेखणी प्रचंड टोकदार होत असे. यातून मग कोणाची सुटका नसे! खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला.

करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत त्यांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली आणि ती सुद्धा क्रीडा पत्रकाराची. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत प्रभावी आणि प्रवाहितपणे चालवत ठेवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक यांच्याप्रमाणे गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाला.

सोपी सुटसुटीत भाषा

चौकार,षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टाहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.

बातम्या आणखी आहेत...