आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम:महाराष्ट्रात 9.5 कोटी नागरिकांचे लसीकरण, राज्यात प्राथमिक शाळांचे वर्गही दिवाळीनंतर उघडणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७०% जनतेचा पहिला डोस, तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५% जनतेचे दोन्ही डोस पूर्ण झाले. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील सर्व महाविद्यालयांत ४० लाख विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा कोविड लसीकरण मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार असल्याचेही टोपे तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात सांगितले.

पहिला आणि दुसरा डोस अशा दोन्ही डोसच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. एकूण लसीकरणातही पहिला क्रमांक आपण मिळवला असता, पण उत्तर प्रदेशला जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्याने त्यांनी पहिल्या डोसमध्ये तो क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून आता योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याचे टोपे म्हणाले.

राज्यात प्राथमिक शाळांचे वर्गही दिवाळीनंतर उघडणार
मुंबई | राज्यातील प्राथमिक शाळांचे सध्या बंद असलेले वर्ग दिवाळीनंतर उघडण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने चालवली आहे. रुग्णवाढ आटोक्यात राहिल्यास बालवाडीपासूनचे सर्व वर्ग चालू केले जातील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी “दिव्य मराठी’ला दिली. त्या म्हणाल्या, “आॅनलाइन वर्गाने विद्यार्थी वैतागलेले आहेत. बालवाडीपासून सर्व वर्ग भरावेत, अशी शालेय शिक्षण विभागाची मनीषा आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कसा राहतो याकडे सध्या विभागाचे लक्ष आहे. दिवाळीनंतर म्हणजे १० नोव्हेंबरनंतर कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहून सर्व वर्ग खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल.’

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले...
एकूण लसीकरणातही पहिला क्रमांक आपण मिळवला असता, पण उत्तर प्रदेशला जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्याने त्यांनी पहिल्या डोसमध्ये तो क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून आता योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याचे टोपे म्हणाले.

1. दुसरी लाट संपल्यात जमा आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. मात्र ती पूर्वीसारखी तीव्र नसेल.
2. वर्ष २ ते १८ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी प्रोटोकाॅल आणि लस उपलब्ध करावी, अशी विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे.
3. माॅल आणि लोकल वगळता राज्यात कशावरही कोविड संदर्भातील निर्बंध नाहीत. राज्य निर्बंधमुक्त झाले आहे.
4. नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...