आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार भिकारी, माझी लस दडवली!:26 एप्रिलनंतर राज्याला एकही डोस नाही; मुंबई, पुणे, नाशकात लसीकरण बंद; लसवाटपात महाराष्ट्रावर अन्याय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णसंख्येत नंबर 1, लसवाटपात नंबर 22 : अशोका विद्यापीठाचा अभ्यास
  • रुग्णसंख्येच्या निकषावर महाराष्ट्रासाठीचा लसपुरवठा सर्वात कमी

कोरोना प्रतिबंधक लसीअभावी केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारी व्यवस्था अक्षरश: भिकारी अवस्थेत असल्यासारखी स्थिती असून दुसरीकडे लसीकरणासाठी तयार असलेल्या सर्वसामान्यांमध्ये मात्र लस दडपादडपीच्या या खेळामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. परिणामी, राजा भिकारी माझी टोपी घेतली, या चालीवर लसीबाबत ‘सरकार भिकारी, माझी लस दडवली’ असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून २६ एप्रिलनंतर महाराष्ट्राला लसीची एकही मात्रा (डोस) प्राप्त झालेली नसून आणखी दोन दिवस लस मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी राज्यातील ४५ वयापुढच्या ज्येष्ठांचे लसीकरण संकटात सापडले असताना उद्धव सरकार मात्र १८ ते ४४ या वयोगटासाठी १ मेचा मुहूर्त साधला याचेच ढोल बडवत आहे. लसटंचाईचे तीव्र पडसाद सोमवारी अहमदनगरमध्येही उमटले. तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प होताच संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

४५ वयापुढच्या ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, तर १८ ते ४४ वयोगटाची जबाबदारी राज्याची आहे. केंद्र सरकार दर तीन दिवसांनी राज्याला लस पुरवठा करते. १६ जानेवारी रोजी देशात लसीकरणास प्रारंभ झाल्यापासून आत्तापर्यंत केंद्राने महाराष्ट्राला कोविशील्डच्या १ कोटी ४७ लाख आणि कोव्हॅक्सिनच्या १६ लाख मात्रा पुरवल्या आहेत. २६ एप्रिलनंतर राज्याला एकही लस मात्रा प्राप्त झालेली नाही. बुधवारी (ता.५) लस पुरवठा होईल. त्यानंतर गुरुवारपासून ज्येष्ठांचे रखडलेले लसीकरण पुन्हा सुरू होऊ शकते, असे राज्य लसीकरण अधिकारी डाॅ. दिलीप नारायण पाटील (पुणे) यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. ‘राज्य सरकारने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या प्रत्येकी १ कोटी मात्रा मागवल्या आहेत. त्या काही आठवड्यांत राज्याला मिळतील. मात्र ही राज्य सरकारने खरेदी केलेली लस असल्यामुळे केवळ १८ ते ४४ वयोगटासाठीच ती वापरता येणार आहे,’ असे डाॅ. पाटील म्हणाले.

राज्यभरात केवळ ६०० केंद्रे कार्यरत
राज्यात सरकारी ४,४९५ आणि खासगी ३३७ लसीकरण केंद्रे आहेत. मात्र लस पुरवठा होत नसल्याने जेमतेम ६०० केंद्रे कार्यरत ठेवावी लागत आहेत. राज्याने एका दिवसात साडेपाच लाख डोस देण्याचा विक्रम केला आहे, तर राज्याची क्षमता ८ लाख इतकी आहे. मात्र लस तुटवड्यामुळे २ मे रोजी राज्यात अवघी ४७ हजार इतकी अल्प लस टोचणी झाली.

मुंबईत पाच तर पुण्यात सलग ४ दिवस लसीकरण बंद
४५ वयापुढच्या नागरिकांचे लसीकरण बृहन्मुंबई महापालिकेने गेले पाच दिवस लस तुटवड्यामुळे थांबवले आहे. मुंबईत १३६ लसीकरण केंद्रे कार्यरत होती. मात्र लस तुटवड्यामुळे आता ५ केंद्रे चालू असून तेथे फक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. मुंबईला दैनंदिन ५० हजार लस मात्रांची गरज आहे. मुंबईत दुसऱ्या मात्रेसाठी २० लाख ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेत आहेत. ज्येष्ठांची गर्दी वाढू लागल्याने पालिकेने ‘वाॅक इन’ लसीकरण पद्धत बंद केली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

आघाडी अन् भाजपचे सोयीस्कर मौन
१८ ते ४४ वयोगटातील संथ लसीकरणाबाबत भाजपने टीका करायची नाही, तर ४५ पुढच्या नागरिकांसाठी केंद्र लस पुरवठा करत नसल्याबाबत राज्य सरकारने ओरड करायची नाही, असा अलिखित समझोता भाजप आणि आघाडी सरकारमध्ये ठरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चुप्पी साधल्याचे सांगण्यात येते. अहमदनगर महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रावर सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही नागरिकांना लस मिळाली नाही. त्यामुुळे संतप्त नागरिकांनी केंद्रासमोरच ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन केले.

रुग्णसंख्येच्या निकषावर महाराष्ट्रासाठीचा लसीचा पुरवठा सर्वात कमी
रुग्णसंख्या या निकषावर लसपुरवठा केल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्यांना आतापर्यंत पुरवण्यात आलेली लस आणि तेथील रुग्णसंख्या याचा तुलनात्मक अभ्यास यात करण्यात आला.

  • गुजरातला सर्वाधिक म्हणजे एका रुग्णाच्या मागे लसीच्या 30.59 मात्रा मिळाल्या आहेत.
  • महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वात कमी म्हणजे एका रुग्णामागे अवघ्या 3.68 मात्रा आल्या आहेत.

लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय
सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला केल्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी राज्यातील रुग्णसंख्या आणि लोकसंख्या या दोन्ही निकषांवर हा पुरवठा अत्यंत तोकडा असल्याचे अशोका विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक डेटा अँड अॅनालिसिस’ विभागाने प्रकाशित केलेल्या “कोविड व्हॅक्सिन प्रोग्राम : नॉट अ रोझी पिक्चर’ या अभ्यास अहवालातून पुढे येते. रुग्णसंख्या आणि लोकसंख्या या दोन्ही निकषांवर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला लसींचा पुरवठा अपुरा असल्याचे धक्कादायक वास्तव या अभ्यासातून सिद्ध होते. उर्वरित. पान १०

देशात सर्वाधिक, पण रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वात कमी लस पुरवठा
महाराष्ट्राला लसींचा सर्वाधिक पुरवठा केल्याचा केंद्र सरकारचा दावा असला तरी तो अपुरा असल्याची राज्य सरकारची तक्रार आहे. लसीकरण केंद्रांवरील रांगा आणि लसीअभावी बंद पडलेली केंद्र यातून ते सिद्ध झाले आहेच. ही परिस्थिती उद्भवण्यामागे केंद्र सरकारच्या लस पुरवठ्याच्या धोरणातील तर्कसंगतीचा अभाव असल्याचे हा अभ्यास सांगतो.

नाशकात कोरोना प्रतिबंधक लसीकरण विस्कळीत;
नाशिक : गुरुवार व शुक्रवार उसनवारीवर लसीकरण पार पाडल्यानंतर शनिवार व रविवारी लसीकरण बंद ठेवणाऱ्या महापालिकेने साेमवारी तारेवरची कसरत करत १८ ते ४५ वयाेगटातील अवघ्या साडेचारशे डाेसवर लसीकरणाची अाैपचारिकता पार पाडली. यातही दुसरा डाेस घेणाऱ्यांची गर्दी अधिक असल्यामुळे १८ ते ४५ वयाेगटातील तुरळक लाेकांनाच लस देता अाली. दरम्यान, मंगळवारी लसीकरण पूर्णपणे बंद ठेवले जाणार असून दिवसभरात लसींचा साठा अाल्यास बुधवारबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाणार असल्याची माहिती लसीकरण माेहिमेच्या समन्वयक डाॅ अजिता साळुंखे यांनी दिली. महापालिकेने स्वत:चे २७ तर खासगी २२ केंद्रे, शिवाय अाैद्याेगिक वसाहतीत ९ ते १० कॅम्प अायाेजित केले आहेत. अातापर्यंत कोविशील्डचे दोन लाख ५१ हजार ६५० डोस तर कोव्हॅक्सिनचे ४३ हजार ९६० डोस प्राप्त झाले अाहेत.

पुण्यात सलग चौथ्या दिवशी लसीकरण नाही
पुणे | एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पुरवठा नसल्याने मंगळवारी सलग चौथ्या दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुणे जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रमास वेग देण्यासाठी ‘मिशन १०० डेज’ सुरू करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६७० लसीकरण केंद्रे कार्यन्वित करण्यात आली. याद्वारे आतापर्यंत एकूण २२ लाख ४७ हजार ९०३ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी करण्यात आलेल्या ६० वर्षांवरील ७४ टक्के नागरिकांचे तर ४५ वर्षांवरील ४४ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील २३२५ जणांचे लसीकरण करण्यात आले असून पुरेशा लसी उपलब्ध नसल्याने या वयोगटातील लसीकरण रखडले आहे.

औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे तुटवड्यामुळे मंगळवारी लसीकरण मोहिमच बंद ठेवण्यात आली आहे.
मराठवाड्यात ठिकठिकाणी लसीकरणाची माेहीम राबवण्यात अाली. यात नांदेड जिल्ह्यातील पाच केंद्रावर सोमवारी ३ हजार ३०० जणांचे लसीकरण केले गेले. नांदेड शहरामध्ये खासगी रूग्णालरात कोवॅक्सिनचा पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला. परंतु एक महिन्याचा कालावधी हाेऊन बरेचसे दिवस होऊनही कोवॅक्सिन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. लातूरमध्ये ४० केंद्रांवर लसीकरण केले जात अाहे.

परंतु साेमवारी केवळ लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात अाले. १ अाणि २ मे राेजी १८ ते ४४ वयाेगटातील १४७६ जणांनी डाेस घेतला. उस्मानाबादेत १०६५ जणांनी साेमवारी लसीकरण करून घेतले. बीड जिल्ह्यात सोमवारी १ हजार १२६ जणांचे लसीकरण झाले. यात, १ हजार ४८ जणांनी पहिला डोस तर ७८ जणांनी दुसरा डोस घेतला.१८-४४ वयोगटातील ६३७ जणांना लस दिली गेली. हिंगोली जिल्ह्यात पाच तालुक्यात तसेच ४ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सोमवारी लसीकरण केले गेले. १८ ते ४४ वयाेगटातील १०७२ जणांचे लसीकरण करण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...