आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानाची तोडफोड; राजगृहाला 24 तास संरक्षण, सरकारचा निर्णय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राजगृहाबाहेर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नाेंदवला.
  • तोडफोडप्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात

भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान राहिलेल्या ‘राजगृह’ची मंगळवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या घटनेचा सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.दरम्यान, राजगृह तोडफोडप्रकरणी माटूंगा पोलिस स्थानकामध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. राजगृहाच्या बाहेर २४ तास पोलिस संरक्षण ठेवले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तोडफोड झाली त्यावेळी प्रकाश आंबेडकर अकोला येथे होते. रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये उभारले. भीम अनुयायी राजगृहाला भेट देेण्यासाठी दररोज येत असतात. येथे बाबासाहेबांच्या अस्थी, ग्रंथसंपदा, वापरातल्या वस्तू, पत्रव्यवहार आणि दुर्मिळ चित्रांचे छोटेखानी संग्रहालय बनवण्यात आले आहे.

हिंदू काॅलनीतील या तीन मजली वास्तूमध्ये बाबासाहेबांच्या सून मीराताई, नातू आनंदराज, भीमराव आणि प्रकाश येथे राहातात. आंबेडकर कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. तर, कार्यकर्त्यांनी राजगृहाजवळचा बेस्टचा बसस्टाॅप हटवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सकाळी राजगृहाला भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी तोडफोडीचा निषेध केला. २०१६ मध्ये राजगृह परिसरात असलेले आंबेडकर भवन पाडले होते. मात्र, त्यास भवनच्या ट्रस्टीमधील वादाची पार्श्वभूमी होती. त्याच्या निषेधार्थ राज्यात मोर्चे निघाले होते.

दाेषींवर कठोर कारवाई करणार : गृहमंत्री

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहावरील तोडफोडीचा तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. राजगृहाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती घराची नासधूस केल्यानंतर अंगणातून बाहेर पडताना फुलांच्या कुंड्या पाडून गेल्याचे कैद झाले आहे.

0