आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढा 'कोरोना’शी:मुंबईमध्ये भाजी विक्रेत्यांना वीस, तर ग्राहकांना साडेतीन फूट अंतराची सक्ती 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईतील अंधेरी येथे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी कॅम्प लावण्यात आला आहे. - Divya Marathi
मुंबईतील अंधेरी येथे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी कॅम्प लावण्यात आला आहे.
  • भाजीविक्रीला अंतराच्या अटींवर मुंबई महापालिकेने दिली परवानगी

मुंबईत कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आणखी कठोर पावले उचलली आहेत. दोन भाजी विक्रेत्यांमध्ये किमान वीस फूट आणि ग्राहकांत आपापसात किमान साडेतीन फूट अंतर ठेवावे, अशी सक्ती मुंबई महापालिकेने सोमवारी लागू केली आहे. या अटी व शर्तींवर भाजी व फळविक्री करता येईल. जेथे या अटी पाळल्या जाणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.

या अटीनुसार भाजी, फळविक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे व या नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा करणे इत्यादीचे व्यवस्थापन महापालिकेचे विभागस्तरीय ‘सहायक आयुक्त’ करणार आहेत तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक यांचे यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे.

अंतराची अट टाकून तात्पुरत्या स्वरूपातील फळे, भाजीविक्रीला परवानगी देण्यात यावी. अशी दुकाने मोठ्या रस्त्यालगत व पुरेशी जागा असलेल्या ठिकाणी असावीत. वर नमूद केल्यानुसार दोन विक्रेत्यांमधील किमान अंतर व दोन ग्राहकांमधील किमान अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यास ही दुकाने तत्काळ हटवण्याचे अधिकारही विभागस्तरीय सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. एकूणच आता मुंबईतील नियम हे कडक करण्यात आले आहेत. 

कडक अटी : अटी पाळल्या नाही तर परवाने रद्द केले जाणार; आयुक्तांचे आदेश... 

  • कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण कटाक्षाने स्वतंत्र खोल्यांमध्येच करण्यात यावे.
  • लक्षणे असलेले, लक्षणे नसलेले तसेच ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा सर्वच व्यक्तींचे घरातल्या घरात किंवा महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जागांमध्ये विलगीकरण करण्यात यावे.
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात यावी.

नागपूर : कोरोनाबाधितांचा आकडा ४९; एकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

उपराजधानी नागपुरातील कोरोनाबाधितांमध्ये आणखी आठ जणांची भर पडल्याने आकडा ४९ वर पोहोचला आहे. संसर्ग वाढू नये यासाठी नागपुरात प्रशासनाकडून वस्तीनिहाय लॉकडाऊनवर िवशेष भर दिला जात आहे. 

रविवारी नागपुरात एकाच दिवशी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर चोवीस तासांच्या कालावधीत त्यात आणखी ८ रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. यात दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या बैठकीतून परतलेल्या तिधा जणांचा समावेश आहे, तर काही जण जबलपूरचे रहिवासी असल्याची माहिती असून हे सर्वच जण नागपुरातील आमदार निवासातील विलगीकरण कक्षात मागील काही दिवसांपासून आहेत. 

कराड : सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

सातारा : साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल १० अनुमानितांचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले आहेत. या १० अनुमानितांमध्ये ८ पुरुष व १ महिला व ९ महिन्यांच्या स्त्री जातीच्या बाळाचा समावेश आहे. कराडच्या जिल्हा रुग्णालयातील अनुमानित कक्षात दाखल ६ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले. सहा अनुमानितांमध्ये तीन पुरुष व ३ महिलांचा समवेश आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.

मालेगाव : १ पॉझिटिव्ह, १५२ प्रलंबित; शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली २९ वर

शहरात  नऊ कोरोनाबाधितांच्या निकटच्या लोकांना करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये सोमवारी (दि.१३) एका ८ वर्षांच्या बालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याला तातडीने कोरोना विशेष उपचार कक्षात हलवण्यात आले आहे. शहरात सोमवारी अखेर  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २९ झाली आहे.  यातील एकाचा मृत्यू झाला आहे.याशिवाय मालेगावच्या रहिवासी २२ वर्षीय तरुणीचादेखील धुळे येथील रुग्णालयात यापूर्वीच उपचार सुरू असताना कोरोनामुळे बळी गेला आहे. सामान्य रुग्णालयाने पाठवलेले १५२ संशयितांचे चाचणी अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे मालेगावमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...