आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक:फडणवीसांशी चर्चेनंतरच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शहांकडून यादीवर शिक्कामोर्तब

मुंबई एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही चार उमेदवार उभे केले, कारण आमची ताकद : चंद्रकांत पाटील

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या ४ उमेदवारांची घोषणा शुक्रवारी केली. अपेक्षेप्रमाणे यादीवर देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा असल्याचे दिसते. भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांनी यादी अंतिम करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आणि यादी मंजूर केली. 

या चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, विनोद तावडे उपस्थित होते. यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही चार उमेदवार उभे केले, कारण आमची ताकद आहे. चौथा उमेदवार हा आमचा अधिकार आहे. भाजपमध्ये राज्याने इच्छुकांची नावे पाठवणे, दिल्लीत उमेदवारांची पार्श्वभूमी सांगितली जाते. त्यानंतर उमेदवारी दिली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. 

रणजितसिंह मोहिते पाटील : रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आले होते. ते सोलापूर येथील एक महत्त्वाचे राजकीय प्रस्थ असून माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

गोपीचंद पडळकर : धनगर समाजाचे नेते असलेल्या गोपीचंद पडळकरांनी लोकसभेला वंचितकडून सांगलीतून निवडणूक लढवली. त्यांनी मोदींच्या विरोधात घोषणाही दिल्या होत्या. विधानसभेच्या वेळी ते भाजपमध्ये आले आणि अजित पवारांविरुद्ध  बारामतीतून लढले. फडणवीस यांचे समर्थक असलेल्या पडळकर यांना संधी देणे हा रासपच्या महादेव जानकरांना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

प्रवीण दटके | दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते असून नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष आहेत. विधानसभेला ते इच्छुक होते. परंतु, उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याच प्रयत्न यानिमित्ताने केला आहे. त्यांचे वडील संघाचे, जनसंघाचे सक्रिय कार्यकर्ते होते.

डॉ. अजित गोपछडे | डॉ. अजित गोपछडे हे नांदेडचे असून बालरोगतज्ञ म्हणून प्रख्यात आहेत. विद्यार्थी दशेपासून संघाशी निगडित आहेत. अंबाजोगाईत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गोपछडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. सध्या ते भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...