आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपाल नियुक्त आमदार:संभाव्य आमदारांच्या यादीला मिळाला मंगळवारचा मुहूर्त, ऊर्मिलाचे नाव सेनेकडून निश्चित

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयामुळे वरुण देसाईंचे नाव यादीमध्ये नाही

राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी राजभवनकडे पाठवली जाणार आहे. त्यात तिन्ही पक्षांचे चार-चार सदस्य असतील, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री हे सरकारच असतात. त्यामुळे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची शिफारस करताना मंत्रिमंडळात ठराव मंजूर करण्याची नियमात तरतूद नाही. तसेच तशी प्रथा आजपर्यंत नव्हती. मात्र, मंत्रिमंडळाची संमती नाही, असा तांत्रिक मुद्दा राज्यपाल उपस्थित करतील यासाठी हा विषय गुरुवारच्या बैठकीत आणल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. डिसेंबर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नामनियुक्तच्या रिक्त जागांवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे आणि मुंबई संघटक व सोशल मीडिया सेलच्या प्रमुख अदिती नलावडे यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, त्या शिफारशीला मंत्रिमंडळाची मंजुरी नाही, असे कारण तेव्हा राज्यपाल यांनी दिले होते. त्यामुळे गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत १२ सदस्यांच्या शिफारशींचा लिखित प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच तो मंजूरही झाला, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरत आहे. तत्पूर्वी या १२ सदस्यांच्या मंजुरीचा प्रश्न सुटेल, असे आघाडी सरकाराचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर हिच्याशी फोनवर बातचित केली. उर्मिलाने विधानपरिषेदवर येण्यास होकार दिला आहे. उर्मिलाची शिवसेनेच्या कोट्यातून नियक्ती केली जाणार आहे. मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसेच राज्यपाल नियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिलाच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी यादी अंतिम केल्याचे समजते.

वयामुळे वरुण देसाईंचे नाव यादीमध्ये नाही
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरचे नाव शिवसेनेकडून राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवले जाणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. युवा सेनेचे पदाधिकारी वरुण देसाई यांचे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी वय निकषात बसत नसल्याने त्यांचे नाव यादीत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून यादीवर आक्षेप घेतला जाणार नाही, असा आघाडी सरकारला विश्वास आहे. त्या त्या पक्षाकडे त्यांची चार-चार नावे निश्चित आहेत. मात्र, ती सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे दिली जाणार आहेत.