आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय दंगल:मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठीच अमरावती, मालेगावात हिंसाचार! भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर हल्ला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीत गुजगोष्टी करताना फडणवीस अन् चंद्रकांत पाटील - Divya Marathi
बैठकीत गुजगोष्टी करताना फडणवीस अन् चंद्रकांत पाटील

अमरावती, नांदेड, मालेगाव आदी ठिकाणी झालेला हिंसाचार हा प्रयोग आहे. यामागे एक पॅटर्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला उत्तर देता येत नसल्याने अराजक निर्माण करून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (१६ नोव्हेंबर) केला. तसेच आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक दादर येथील वसंतस्मृतीमध्ये झाली. मुंबईसह राज्यातील १० महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले. राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ मुख्यमंत्री हवा असून हिंमत असेल तर आघाडी सरकारने नव्याने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी दिले. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. आपल्या पलीकडे पाहायची कुणाची तयारी नाही, असा चिमटा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना काढला. तर शिवसेना आता २४ कॅरेट सोन्याप्रमाणे राहिली नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

हिंसाचारावरून आघाडीला टार्गेट : रझा अकादमीच्या बैठकीत भाजप नेते आशिष शेलार होते असा आरोप अल्पसंख्याक मत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच आघाडीतील नेत्यांनीही राज्यातील हिंसाचारामागे भाजप असल्याचा आरोप केल्यामुळे मंगळवारच्या बैठकीत भाजप नेत्यांनी शिवसेनेसह आघाडी सरकारला टार्गेट केले.

मुख्यमंत्री पार्टटाइम : राज्यातील जनतेने २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री आहेत. आघाडीने हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी दिले.

यांची उपस्थिती : या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवय्या, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे , माजी मंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

निर्णय आणि ठराव :
. कोरोना विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या स्पृहणीय कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.
२. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत ठराव मांडला. बलात्कार, अंमली पदार्थ, भ्रष्टाचार, व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न म्हणून पक्षातर्फे राज्यभरात सभा घेणार.
३. आघाडी सरकार विरोधात एल्गार पुकारण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर २०,००० छोट्या सभांचे आयोजन करण्यात येणार.
४. डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करणार.
५. एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणी बैठकीत पाठिंबा देण्यात आला.
६. अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीची मास्टरमाईंड असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

राहुल गांधींच्या पोस्टनंतर लगेच मोर्चे : फडणवीस
अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा प्रयोग आहे. देशात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीचा हा पॅटर्न आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. हिंदूंची दुकाने शोधून जाळली जातात; पण महाविकास आघाडीचा एकही नेता एक शब्द बोलत नाही. हिंदू असो वा मुस्लिम, कुणाचीच दुकाने जाळली नाही गेली पाहिजेत, असे सांगून त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्याची खोटी छायाचित्रे पसरवण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरातील अत्याचाराची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकली. लगेच ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मोर्चे निघाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

भाजप नेत्यांचे बोल
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामूहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष

कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडीत काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. या राज्यातील तक्रारदार सुरक्षित नाही. तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षित नाही तर पोलिसांना वसुलीची कामे दिली जात आहेत. - अॅड. आशिष शेलार

बाळासाहेब ठाकरे यांची २४ कॅरेट शिवसेना होती. ती आता बदलली आहे. आधीच राज्यात एक पंतप्रधान होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत. आता दुसरे आले आहेत. - सुधीर मुनगंटीवार

बातम्या आणखी आहेत...