आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर:राज्यपालांच्या टीकेनंतर ठाकरेंची अधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले -पाणी पुरवठा योजनेवर माझी नजर

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल व भाजपने औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन सत्ताधारी शिवसेनेची चौफेर कोंडी केल्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या प्रश्नात जातीने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करताना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या. कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे, अशी तंबीच त्यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादमधला पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. भाजपच्या जलआक्रोश मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रश्नी विशेष लक्ष घातले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

बैठकीस उपस्थित पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील कायमच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती.

केंद्राकडून परवानगी आणा

जायकवाडी धरणातील उद्भव विहीर ( जॅकवेल ) घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल, पण ही परवानगी मिळूस्तोवर इतर कामे थांबू देऊ नका. जलकुंभ, पाईप्स कोटींग करणे त्याचबरोबर खोदकाम ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत, मी स्वत: ती कामे पाहणार आहे, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात पाणी वितरणासाठीच्या आराखडयास देखील वेळच्यावेळी परवानगी पालिकेने दिली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कामे खोळंबता कामा नये.

पाइप पुरवठा सुरू

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या कामास वेग देण्यात आला असून कंत्राटदाराने सर्व 83.62 किमी डीआय पाईप्स मागविले आहेत. तसेच 780 मी लांबीचे एमएस पाईप्स तयार करण्यात आले असून कोटींगचे काम सुरू आहे. जल शुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभाच्या तराफे भिंतींची कामे वेगाने सुरू आहेत. 160 किमी साठी एचडीपीई पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असून 13.04 किमी डीआय पाईप्सचा पुरवठाही कंत्राटदारास करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, पाणीपुरवठा योजना काम प्राधान्याने पूर्ण करीत असून नियोजनबद्धरीतीने आराखडे तयार करून पुढे जात आहोत. नागरिकांना देखील विश्वासात घेत असल्याचे त्यांंनी सांगितले. शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असून, जायकवाडी उद्भवातून 6 दलली पाण्याची वाढ तर , हर्सूल धरणातून 6 दलली पाण्याची वाढ करण्यात आली आहे. जायकवडी उद्भवातून आणखी 3 दलली आणि हर्सुल धरणातून 3 दलली पाण्याची वाढ करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...