आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरांच्या घरी मुख्यमंत्री शिंदे:बाप्पांचे घेतले दर्शन; म्हणाले- माझे आणि नानांचे मैत्रीचे संबंध, त्यांचे​​​​​​​ चित्रपट नेहमी पाहतो

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''माझे आणि नाना पाटेकरांचे मैत्रीचे संबंध आहेत. मी त्यांचे नेहमी सिनेमे पाहतो. कोविडमध्ये मी आजारी होतो तेव्हा नानांचे सर्व सिनेमे पाहिले. आज त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनीच मला काॅल करून बोलावले होते अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही आरती केली. यानंतर मुख्यमंत्री अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी वार्तालाप केला.

मी त्यांच्या चित्रपटांचा फॅन

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसांपूर्वी नाना पाटेकरांचा मला काॅल होता. पुण्यात जर दौरा झाला तर घरी या असे नाना पाटेकर म्हणाले होते, त्यानंतर मी गणेश दर्शनासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी आग्रह केला नव्हता पण पुण्यात दौरा झाला त्यामुळे मी गेलो. माझे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मी त्यांचे नेहमी सिनेमे पाहतो. कोविडमध्ये मी आजारी होतो तेव्हा नानांचे सर्व सिनेमे पाहिले.

नानांची राहणी, घरही साधी

एकनाथ शिंदे म्हणाले, नानांचे घर साधे आहे. त्यांची साधी राहणी आहे. त्यांचे दिखावटी काही नाही जे आहे तसे चांगले आहे. सत्तांतराचे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही.

एकत्र निवडणूक लढवणार

एकनाथ शिंदे म्हणाले, आमची आणि भाजपची युती आहे, मनपा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत निर्णय झाला आहे. गणेश उत्सव, पितृ पंधरवाडा, नवरात्र आहे त्यानंतर दसरा आणि मेळावा आहे, त्यावर आताच काय बोलायचे.

पाटेकरांच्या बाप्पांचे घेतले दर्शन

यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.कसबा पेठ, त्वष्टा कासार, तरूण अशोक मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ, साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणेशमंडळांना एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...