आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“तुमच्यात अजिबात हिंमत नाही, तुम्ही विश्वासघातकी आहात. पक्षातील दोन नंबरच्या नेत्याने दगा दिला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फोटो न वापरता स्वत:च्या आई-वडिलांचे नाव वापरून सभा घ्या आणि निवडून या,’ असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० बंडखोर आमदारांवर टीका केली. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपसह आमदारांचाही समाचार घेतला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर “आवाज’ वाढवत मंगळवारी टीकेचे “बाण’ सोडले.
उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत म्हणतात, शिवसेनेतून पालापाचोळा उडत आहे. जी पानं गळणं गरजेचं आहे, ती गळत आहेत. झाडाकडून सर्वकाही मिळाल्यानंतर पानं टवटवीत झाली की गळून पडतात. पानगळ होते तेव्हा आपल्याला वाटते की झाडाला काय झाले असेल. पण आठ-दहा दिवसांनंतर झाड हिरवेगार होतेच. हिंदुद्वेषी घरातच आहेत. ते कपाळकरंटे आहेत, अशी टीकाही ठाकरेंनी केली.बंडखोरांना बाळासाहेब आणि ठाकरे हे वेगळे करायचे आहेत. बाळासाहेबांना मानसन्मान न दिल्यास लाेक तुम्हाला जोड्याने हाणतील. म्हणूनच त्यांच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. मी कायदा वाचला नाही. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे घटनातज्ज्ञांनी सांगितल्यानुसार शिंदे गटासमोर एकच पर्याय आहे. त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना आपली जागा दाखवेल. मी शिंदे यांना माझ्या कुटुंबातील समजत होतो. मी त्यांना मुख्यमंत्री केले असते तरी त्यांनी हेच केले असते. ते स्वत:ला बाळासाहेब समजत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. मी ज्या वेळी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होतो, त्याच वेळी सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू झाले. मी पाच ते सहा दिवस गुंगीत होतो. अनेकांनी माझ्यासाठी देव पाण्यात ठेवले होते, तर काही जणांनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले. ठाणेकर सुज्ञ आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
माझा माइक कुणीही खेचला नाही : मी मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते नेहमी माझ्या बाजूला असायचे. काही प्रश्नांची उत्तरे मी द्यायचो, तर काही प्रश्नांची उत्तरे पवार द्यायचे. मात्र, आम्ही कधीच एकमेकांचा माइक खेचला नाही, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या
^त्यांना काय बोलायचे आहे, ते बोलू द्या. आम्ही सर्वजण एकत्र बोलू. त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत. पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे राज्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची मॅच फिक्स होती
^ ही मॅच फिक्स होती. मला लाइव्ह मॅच बघायला आवडते. ठाकरे सरकारने शेवटच्या बैठकीत ४०० जीआर काढले. पाचपट पैसे वाटले, तिजोरीवर भार येऊ नये म्हणून आम्ही काही निर्णयांना स्थगिती दिली. आदित्यांच्या खात्याचेच ऑडिट करतोय असे नाही.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
राजकारणामध्ये स्वत:ची उंची वाढवा ^शिवसेनाप्रमुख तुमची खासगी संपत्ती नाही. शिवसेनाप्रमुखांची उंची कमी करण्याचे काम करू नका. आम्ही सर्वजण शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईने आमदार, खासदार आणि मंत्री झालो, हे आम्ही नेहमी सांगत असतो. तुम्हाला राजकारण करायचे असेल तर त्यासाठी स्वत:ची उंची वाढवा. - संजय शिरसाट, आमदारसविस्तर. दिव्य सिटी
शिंदेंना मारण्याची सुपारी दिली
^ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली, हा काही पहिला प्रयोग नाही. मी शिवसेना सोडली होती, तेव्हा परदेशी गँगस्टरना सुपारी दिली होती. साहेबांनी मोठे केलेल्या कर्तबगार एकेकाला कमी करण्याचे काम यांनी केले. रमेश मोरे, जयेंद्र जाधव यांची हत्या कुणी केली? ठाण्याच्या एका नगरसेवकाची हत्या कुणी केली.
- नारायण राणे, केंद्रीय मंत्री
बाळासाहेबांच्या सुनबाई स्मिता ठाकरे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
दिवसभर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे वाक्युद्ध सुरू असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई स्मिता ठाकरे यांनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. “शिंदे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत. ही केवळ सदिच्छा भेट aआहे,’ असे सांगत स्मिता ठाकरे यांनी अधिक बोलणे टाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.