आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पाच उमेदवार निवडून आणले. तर शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी बाजी मारली. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पडवी विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले. काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विजयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती आता विधान परिषद निवडणुकीत 134 मते घेतली. महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते पण काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली. आमच्या उमेदवारांनी प्रचंड मते घेत विजय मिळवला. पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना या विजयात महत्व देत असल्याचे ते म्हणाले.
तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही
राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे, राज्यात लोकाभिमूख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही फडणवीस म्हणाले.
संघर्ष सत्तेसाठी नव्हे लोकांसाठी
सर्व पक्षांतील आमदार आणि अपक्षांचे आभार मानत फडणवीसांनी आमचा संघर्ष जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही असेही ते म्हणाले. परिवर्तनाची ही सुरुवात आहे. महाविकास आघाडीविरोधात जनतेत खदखद असल्याचेही ते म्हणाले.
मविआची मते फुटली
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 21 मते फुटली. त्यात शिवसेनेची तीन मते इतरांनी पळवली, तर राष्ट्रवादीच्या पारड्यात सहा मते अतिरिक्त पडली. काँग्रेसची तीन मते फुटल्याचे समजते. 44 पैकी 41 मते काँग्रेसला पडली.
विजयी उमेदवार (कंसात मते)
भाजप : प्रवीण दरेकर (26), श्रीकांत भारतीय (26), उमा खाकरे (26) राम शिंदे (26), प्रसाद लाड (28)
शिवसेना : आमशा पाडवी (26), सचिन आहिर (26)
राष्ट्रवादी : रामराजे निंबाळकर (26), एकनाथ खडसे (27)
काॅंग्रेस : भाई जगताप (26)
काँग्रेसच्या हंडोरे पराभूत
चंद्रकांत हंडोरे (22) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. विधान परिषदेतही फडणवीसांनी चमत्कार करून विजय साकारला. मुळातः भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड यांना निवडणुकीत उभे केले पण भाजपकडे पाचव्या जागेच्या विजयासाठी एकही मत नव्हते पण त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीची तसेच अपक्षांची मते मिळवत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळवली.
285 आमदारांचे मतदान
विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांनी मतदान केले. काँग्रेसने भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी रखडली होती. मात्र, आधी राज्य निवडणूक आयोग आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. मात्र, त्यामुळे मतमोजणी दोन तास रखडली होती.
राजकारण 2 मतांचे
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर अशोक चव्हाण यांनी दोन्ही मते रद्द करावी अशी मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर परवानगी घेऊनच टिळक आणि जगताप यांनी मतदान प्रकियेत मदत घेतली, असा दावाही त्यांनी केला.
असंवेदनशीलतेचा कळसः फडणवीस
भाजपचे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली. काँग्रेसने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगतापांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
'मविआचे सर्व उमेदवार विजयी होणार'
नाना पटोले म्हणाले की, मतमोजणी सुरु असून भाजप अतिउत्साही आहे, वीस मिनिटांतच निकाल येईल. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने आक्षेप घेतले आणि निवडणूक आयोगाने निकाल दिलेले महाराष्ट्राने पाहिला. आता नियमांना डावलून आमदार मुक्ता टीळक आणि जगताप यांच्या मतात हस्तक्षेप केला होता, यावर आम्ही आक्षेप घेतला त्यानंतर निवडणूक आयोगाने आमच्या बाजुने निकाल दिला नाही असेही ते म्हणाले.
काँग्रेस-भाजपात लढत
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडे मतं नाहीत
भाजपचे 4 उमेदवार कटाकटीने निवडूण येतील. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? हे पाहावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरुद्ध भाजपने प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत.
मविआची प्रतिष्ठा पणाला
भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीचे 6 असे 11 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त 10 मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मविआकडे 170 संख्याबळ
आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आघाडीकडे 170 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.