आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:6 जिल्ह्यांतील 85 जिल्हा परिषद गटांसाठी आज मतदान, सर्वच पक्षांचा ओबीसी उमेदवारांवर भर

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्याअंतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ गणांच्या रिक्त पदांसाठी मंगळवारी पोटनिवडणूक होत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. बुधवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

विदर्भातील नागपूर, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांतील जि.प.च्या ४४ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी भाजपने ठरल्याप्रमाणे सर्व १४ ओबीसी उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस १२ जागा लढवत असून त्यापैकी ११ जागांवर ओबीसी तर एका जागेवर एससी उमेदवारांना उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही १४ पैकी १३ जागांवर ओबीसी आणि एका जागेवर एससी उमेदवारांना तिकीट दिले आहे. शिवसेना ९ जागा लढवत आहे. सर्व जागांवर त्यांनी ओबीसी उमेदवार उभे केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ जागा लढवत असून पाचही जागांवर ओबीसी उमेदवार दिले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा परिषदेच्या तीन जागा लढवत आहे. या तीनही जागांवर प्रहारने ओबीसींना उमेदवारी दिली आहे. पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये निवडणूक होत आहे. भाजपने २७ गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. हे सर्व ओबीसी आहेत. वंचित बहुजन आघाडीने २८ गणांमध्ये ओबीसींनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. केले आहे. राष्ट्रवादीने सात उमेदवार उभे केले असून सहा ओबीसी तर एका खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला तिकीट दिले आहे.

वाशीममध्ये जि.प.चे १४ तर पं.स.च्या २७ गणांत मतदान होत आहे. एकूण १३५ उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ७९ तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवारांचे भाग्य पेटीबंद होणार आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी सर्वच उमेदवार ओबीसी दिले आहेत.

खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी मतदान : धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी दोन्ही जिल्ह्यात मतदान हाेणार आहे. यात दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार नशिब आजमावत आहेत.

धुळे जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण आधीच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे १४ गटातील ४२ व २८ गणांत ७२ असे ११४ उमेदवार रिंगणात आहे. धुळे तालुक्यातील १० व शिंदखेडा तालुक्यातील ४ गटांसह चारही पंचायत समितीच्या २८ गणांसाठी मतदान होईल. त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी ४१ उमेदवार तर १३ गणांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अक्कलकूवा तालुक्यातील कोराई गण अर्ज माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाला आहे. आता ११ गट व १३ गणांसाठी २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी २३६ मतदान केंद्राध्यक्ष, २३६ मतदान अधिकारी, तसेच ४७२ कर्मचारी असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ४७ पोस्टेल बॅलेटचे वाटप करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यात भाजपच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहे. तसेच काही अपक्ष उमेदवारही नशिब आजमावत आहे.

बातम्या आणखी आहेत...