आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी पूर्व मतदारसंघात 31.74 टक्के मतदान:ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह 7 उमेदवार रिंगणात,  6 नोव्हेंबर मतमोजणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधानसभेच्या '166 - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22. 85 टक्के; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली.

या 256 मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक 53 मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण 1,418 मतदारांमध्ये 726 महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले.

मतदानादरम्यान आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर, वैद्यकीय किट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी सोयी सुविधांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडली.

निकाल 6 नोव्हेंबरला

आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी ही रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे, अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात
सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात

7 उमेदवार रिंगणात

  1. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  2. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
  3. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
  4. नीना खेडेकर (अपक्ष)
  5. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
  6. मिलिंद कांबळे (अपक्ष)
  7. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
मतदान केंद्रावर जमलेले नेते व कार्यकर्ते.
मतदान केंद्रावर जमलेले नेते व कार्यकर्ते.

भाजपकडून NOTAचा प्रचार

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतरही ठाकरे गट व भाजपमधील वाद शमलेला नाही. कारण या पोटनिवडणुकीसाठी सोशल मीडियावर NOTAचा प्रचार करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठीच शिंदे-फडणवीसांनी NOTAची रणनीती आखल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर, एकदा माघार घेतल्यानंतर आम्ही आता असा प्रचार का करू? आम्हाला त्याची गरज नाही. मतदारच काय तो निर्णय घेतली, असे प्रत्युत्तर भाजपचे मुरजी पटेल यांनी दिले आहे.

मतदानाला पत्नीसह आलेले मुरजी पटेल.
मतदानाला पत्नीसह आलेले मुरजी पटेल.

पोलिस, राखीव दल तैनात

दरम्यान, आज मतदान शांततेत आणि नि:पक्षपणे पार पडेल, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. निधी चौधरी यांनी सांगितले की, ही पोटनिवडणूक नि:पक्षपणे होण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयांतर्गत जवळपास 2 हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल आणि अन्य सुरक्षा व्यवस्थादेखील सुसज्ज व तैनात असणार आहे.

अंधेरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
अंधेरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

दिव्यांग, वृद्धांसाठी विशेष सोय

मतदान आणि मतमोजणी करताना कोणतीही समस्या येणार नाही याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांवर येण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लिफ्ट आणि उतार मार्गिका रॅम्पचीही सोय केली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना या काळात लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी ‘सुविधा’ उपलब्ध आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

एकही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही

अंधेरी पूर्वमध्ये 2 लाख 71 हजार 502 मतदार संख्या असून याकरिता 256 मतदान केंद्रे आहेत. यात 239 मतदान केंद्र तळमजल्यावर असून 17 केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रांच्या ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. या मतदारसंघात एकही असुरक्षित, संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही.

बातम्या आणखी आहेत...