आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई क्रूझ ड्रग्स पार्टीवर धाड टाकून चर्चेत आलेले NCB अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी म्हणून वानखेडे यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. परंतु, त्यांच्या मुदतवाढीस नकार देत त्यांना यापूर्वीच्याच एका केंद्रीय विभागात बदली देण्यात आली आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर विभागात घरवापसी
समीर वानखेडे यांना आता केंद्रीय महसूल गुप्तचर विभागात (DRI) बदली देण्यात आली आहे. एनसीबीमध्ये येण्यापूर्वी ते याच विभागात कार्यरत होते. 2020 मध्ये DRI येथूनच त्यांची बदली NCB च्या मुंबई झोनल अधिकारी म्हणून करण्यात आली होती. यानंतरच त्यांच्या हातात सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खानसारखी चर्चित प्रकरणे देण्यात आली होती.
सेलिब्रिटी ड्रग्स केसमुळे चर्चेत
एनसीबी अधिकारी म्हणून समीर वानखेडे सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खान प्रकरणात प्रसिद्धीच्या झोतात आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला ड्रग्सचे अँगल लागल्यानंतर वानखेडे यांनी रिया चक्रवर्तीसह अनेक सेलिब्रिटींना अटक केली होती. तसेच अनेक नावाजलेल्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातही ते चर्चेत होते. यामध्ये त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती.
नवाब मलिकांनी केले होते बनावट प्रमाणपत्राचे आरोप
राज्यातील अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेतले आहे. वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळविली. यासोबतच आर्यन खानला अटक झालेली नाही. तर वानखेडेंनी त्याचे अपहरण करून खंडणी मागितली असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहे.
मलिक यांनी वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे खरे नाव दाऊद वानखेडे असल्याचे म्हटले होते. यासोबतच, रोज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या कुटुंबियांवर खुलासे सुरू केले. परंतु, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर पुन्हा कुटुंबियांवर भाष्य करणार नाही असे मलिकांनी लिहून दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.