आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:प्रभाग रचनेच्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची स्वाक्षरी, महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या सुधारणा अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली असून सदर अध्यादेश ३० सप्टेंबर रोजी लागू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाने सदर केलेला अध्यादेश २८ सप्टेंबर रोजी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेची सुधारणा आहे. काँग्रेसने एक सदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी केली होती. २०१९ च्या सुधारणा अधिनियमांद्वारे महापालिकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती.

सध्या महापालिका प्रशासन एक सदस्य प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पालिका कामाला लागल्या आहेत. आता सुधारणा अधिनियम लागू झाल्याने पालिका प्रशासनांची तयारी पाण्यात गेली आहे. पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचे प्रारूप पालिका प्रशासनांना तयार करावे लागणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात २०१७ मध्ये महापालिका निवडणुका ४ सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडल्या होत्या.

आगामी काळात राज्यात १८ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत आघाडी सरकारच्या घटक पक्षांत तीव्र मतभेद होते. काँग्रेस कार्यकारिणीने तर दाेन सदस्यीय प्रभागाचा ठरावही केला हाेता. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाले आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सदर अध्यादेश दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल.

कोविडमुळे बदल
महापालिका निवडणुकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती, मात्र सध्याची कोविडची परिस्थिती पाहता आणि महापालिका प्रशासनांना कामकाज प्रभावी व सुरळीत करता यावे यासाठी प्रभाग सदस्य पद्धतीत बदल करण्यात येत आहे. तसे कारण नगरविकास विभागाने अध्यादेशामध्ये नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...