आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:खबरदार - व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांसाठी गरजेची माहिती; चुकीचे मेसेज टाकणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • कोरोनाबाबात सोशल मीडियावर सावधानता बाळगा, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जनतेला आवाहन

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. समाजमाध्यमाद्वारे कोरोनासंदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरवणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरवलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी शासनाने समाजमाध्यमांकरिता मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. चुकीचे मेसेज टाकणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे देशमुख यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांसाठी

 • चुकीच्या /खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये.
 • ग्रुपमधील सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठवली तर ती आपण पुढे कोणालाही पाठवू नये.
 • ग्रुप अॅडमिन किंवा अन्य ग्रुप सदस्यांनी आक्षेप घेतल्यास तत्काळ पोस्ट त्या ग्रुपवरून व आपल्या मोबाइलवरूनही काढून टाकावी.
 • बातमीचा स्रोत व त्याची सत्यता पडताळूनच ती बातमी आवश्यक वाटल्यासच फॉरवर्ड करावी तसेच ग्रुपवर येणारे व्हिडिओ, मीम्स यांचा उद्देश समजून घेऊनच पुढे पाठवावे.
 • जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल ग्रुप अॅडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही देऊ शकता.
 • वैयक्तिकपणेसुद्धा शेअर करू नये तसेच तुमच्या मोबाइलमध्येही स्टोअर करू नका.

ग्रुप अॅडमिन, ग्रुप निर्मात्यांसाठी

 • ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य जबाबदार व विश्वासार्ह आहे याची खात्री करूनच ग्रुपमध्ये घ्यावे.
 • सर्व सदस्यांना ग्रुपचा उद्देश व नियमावली समजावून सांगावी.
 • सर्व सदस्यांना सूचना द्या की, सदस्याने या ग्रुपवर काही आक्षेपार्ह पोस्ट्स, मेसेजेस, व्हिडिओ, मीम्स किंवा तत्सम बाबी शेअर केल्यास त्याला तत्काळ ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल.
 • परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin करावी.
 • काही सदस्य सूचना देऊनसुद्धा आक्षेपार्ह पोस्ट्स टाकत असतील तर त्यांची तक्रार पोलिस ठाण्यात करा.

ग्रुप सदस्य, ग्रुप अॅडमिन्सना अशी होऊ शकते शिक्षा

 • भारतीय दंड संहिता, १८६० कलम १५३ (अ) व कलम १५३ (ब) : तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा.
 • भादंवि १८६० कलम १८८ : सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा.
 • भादंवि १८६० कलम २९५(अ) : तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा.
 • भादंवि १८६० कलम ५०५ : एखाद्या भागात वा जनतेत भीती निर्माण करणारी पोस्ट केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा.
 • माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ क : एखाद्याची इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, पासवर्ड किंवा कोणत्याही वैशिष्ट्याचा गैरवापर केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा १ लाख दंड किंवा दोन्ही शिक्षा.
 • माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ ड : संगणक प्रणालीचा इंटरनेटवर तोतयागिरी करण्यासाठी वापर केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख दंड किंवा दोन्ही शिक्षा आणि इतर तरतूद.
बातम्या आणखी आहेत...