आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरियर मदर्स!:लेकरांना शुद्ध हवेत श्वास घेण्याच्या हक्कासाठी देशात एकवटल्या लढवय्या 2 हजार माता, राष्ट्रव्यापी नेटवर्क

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शुद्ध हवा हा आपल्या मुलांचा हक्क आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजे या विचाराने झपाटलेल्या लीना, समिता, मनोरमा व त्यांच्यासारख्या तब्बल २ हजार महिला वॉरियर मदर्स म्हणून पर्यावरण रक्षणासाठी धडपडत आहेत. - Divya Marathi
शुद्ध हवा हा आपल्या मुलांचा हक्क आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजे या विचाराने झपाटलेल्या लीना, समिता, मनोरमा व त्यांच्यासारख्या तब्बल २ हजार महिला वॉरियर मदर्स म्हणून पर्यावरण रक्षणासाठी धडपडत आहेत.

वाढते प्रदूषण हा अनेकांच्या चिंतेचा विषय आहे, पण त्यासाठी कृतिशील सहभाग देणारे थोडेच असतात. याला अपवाद आहेत लीना, समिता, मनोरमा व त्यांच्यासारख्या तब्बल २ हजार महिला. शुद्ध हवा हा आपल्या मुलांचा हक्क आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजे या विचाराने झपाटलेल्या या साऱ्या जणी "वॉरियर मदर्स' म्हणून पर्यावरण रक्षणासाठी धडपडत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक संघटना अनेक दिवस जाहीर करत असतात. तसाच एक दिवस होता ७ सप्टेंबर २०२०. त्याचे ब्रीद होते "शुद्ध हवा, निळे आकाश!' त्यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रकाशित झाला. देशातील ९८% मुलांच्या फुप्फुसात अशुद्ध हवा जात असल्याचे त्यात म्हटले होते. तो वाचून अनेक आईंच्या छातीत धस्स झालं. त्यापैकी काही जणींनी ठरवलं, आपण यासाठी लढायचं. त्यातून जन्मलं हे देशव्यापी नेटवर्क "वॉरियर मदर्स'.

काय आहे वॉरियर मदर्स
"वॉरियर मदर्स'मध्ये अनेक राज्यांतील महिला एकत्र आल्या आहेत. शुद्ध हवा हा मुलांचा हक्क आहे. यासाठी त्या प्रदूषणाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहेत. त्यासाठी जनजागृती, प्रशासनाच्या सोबत समन्वय, लोकसहभाग वाढवणे आणि अधिकाधिक "वॉरियर मॉम' तयार करणे, जोडून घेणे असे अभियान त्या राबवत आहेत. २ वर्षांपूर्वी १० महिलांनी सुरू केलेले हे नेटवर्क आज देशभरातील २ हजार वॉरियर मॉम्सचे संघटन बनले आहे. अनेक शहरांतील घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण असे अनेक प्रश्न त्या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सोडवत आहेत.

नागपूर : येथील औष्णिक विद्युत केंद्रामधील प्रदूषणाविरुद्ध झटणाऱ्या लीना बुद्धे
पर्यावरणशास्त्रात पदवी घेतल्यानंतर लीना सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेच्या माध्यमातून कार्यरत होत्या. मुलांना वर्षभर होणारा सर्दी-खोकला, अ‍ॅलर्जीसारख्या आजारांमागे हवेेतील प्रदूषण कारणीभूत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून यावर त्यांनी काम सुरू केले. नागपूर मनपासोबत त्या घनकचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. ओल्या कचऱ्यापासून घरातच खतनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. महिलांच्या आरोग्यावर चुलीच्या धुराचा होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास करत आहेत. कोराडी व खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे प्रभावित गावांमध्ये काम करत आहेत. त्यांनी नागपूर शहरात ४०, ग्रामीण भागात १०० वॉरियर मॉम तयार केल्या आहेत.

चंदीगड : डंपिंग ग्राउंडविरोधात लढणाऱ्या समिता कौर, ५० वॉरियर मॉमचीही एकजूट
चंदीगडमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणासारखे उपक्रमही चांगल्या प्रकारे सुरू होते. समिता कौर एकदा पाहणी करण्यासाठी डंपिंग ग्राउंडवर गेल्या आणि तेथील धक्कादायक चित्र बघून अस्वस्थ झाल्या. एवढ्या प्रयत्नांनंतर नागरिक ज्या कचऱ्याचे वर्गीकरण करून देत होते तो कचरा तेथे एकत्रच डंप केला जात होता. त्यावर जनावरे चरत होती. कचरावेचक फिरत होते. विशेष म्हणजे कचरा डेपोपासून ५०० मीटरवर बांधकाम असू नये या नियमाला धाब्यावर बसून अवघ्या १० मीटरवर सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत बांधण्यात आली आहे. त्याविरोधात समिता कौर आणि त्यांच्या सहकारी न्यायालयीन लढाई देत आहेत. त्यांच्यासोबत पंजाबमध्ये ५० वॉरियर मॉम एकवटल्या आहेत.

झारखंड : निर्धूर चुलींसाठी प्रयत्नशील मनोरमा इक्का, २०० महिलांपर्यंत पोहोचवले अभियान
आदिवासी समाजातील मनोरमा यांनी २००३ मध्ये बालकांच्या हक्कांसाठी होप फाउंडेशनची स्थापना केली. त्या मुलांत निसर्गप्रेम, निसर्ग संवर्धन रुजावे यासाठी कार्यरत होत्या. २ वर्षांपूर्वी त्या झारखंडच्या एकमेव वॉरियर मॉम होत्या. ३ महिन्यांतच त्यांनी हे अभियान २०० महिलांपर्यंत पोहोचवले. आज त्या सर्व झारखंड स्टेट लाइव्हलीहूड मिशन, परसबाग योजनेच्या माध्यमातून स्वच्छ हवा, शुद्ध पाण्यासाठी काम करताहेत. सध्या त्या ग्रामीण महिलांवर होणाऱ्या धुराच्या दुष्परिणामाबाबत काम करत आहेत. चुली उघड्यावर असाव्यात, धुरापासून संरक्षण कसे करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. निर्धूर चुलींसाठी धोरण बनावे यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...