आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Waze Case : Meetings Of The Leaders Of The Mahavikas Aghadi Leaders; Sharad Pawar Said Many Things Have Been Revealed Only Because Of The Home Ministry

​​​​​​​वाझे प्रकरण:महाआघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र; पवारांकडून गृहमंत्र्यांची पाठराखण, म्हणाले - अनेक गोष्टी गृहमंत्रालयामुळेच उघडकीस

नाशिक, मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पी.सी.चाको यांचे राष्ट्रवादीचा गमछा घालून स्वागत करताना शरद पवार. - Divya Marathi
पी.सी.चाको यांचे राष्ट्रवादीचा गमछा घालून स्वागत करताना शरद पवार.
  • मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबते
  • याला हटवणार, त्याला हटवणार या निव्वळ वावड्या : अजित पवार

अँटिलिया स्फोटके व सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री, नेत्यांच्या बैठकांचे सत्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, रात्री नवी दिल्ली येथे आघाडीचे प्रवर्तक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली.

तत्पूर्वी, सकाळी आघाडीच्या वरिष्ठ मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. बैठक सुमारे दीड तास चालली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब उपस्थित होते. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश नव्हता, हे विशेष. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग आदींची बैठक सुरू होती. बुधवारी सकाळी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची राष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असताना आघाडी सरकारचे प्रवर्तक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. काँग्रेसचे केरळमधील नेते पी. सी चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनीच सुरुवातीची कारवाई केली असून नंतर एनआयएने तपास हातात घेतला. एनआयएला तपासात सहकार्य करणे हे आमचे काम आहे. मात्र अधिकारांचा गैरवापर केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याची आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री बदलणार का, असा प्रश्न विचारला असता पवार हसले आणि “ही नवीनच बातमी आहे’ असे म्हणून त्यांनी प्रश्न उडवून लावला. गृहमंत्र्यांनी वाझे प्रकरण चांगले हाताळले अाहे. चुकीचे काम, लोकांच्या अनेक गोष्टी गृहमंत्रालयामुळेच उघडकीस आल्या, अशा शब्दांत त्यांनी गृहमंत्र्यांची पाठराखण त्यांनी केली.

याला हटवणार, त्याला हटवणार या निव्वळ वावड्या : अजित पवार
आम्हाला माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. इतर अधिकाऱ्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून याला हटवले जाणार, त्याला हटवणार अशा बातम्या येत आहेत, परंतु सरकार कोणताही निर्णय असाच घेत नाही. सरकार कोणत्याही अधिकारी अथवा मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत नाही तसेच पुराव्याशिवाय कुणावरही कारवाई करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. निव्वळ वावड्यांच्या आधारे कुणावरही कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

नियुक्त्या, बदल्या विषयावर चर्चा नाही; तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीसंदर्भात अथवा इतर काही सूचना दिल्या का, असे विचारले असता, “मी कुणालाही निर्देश देत नाही. नियुक्त्या आणि बदल्या या विषयांवर आम्ही बोलत नाही, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही धोरणांबद्दल चर्चा करतो,’ असे पवारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...