आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया-हिरेन प्रकरण:वाझे 30 मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत; देशमुखांची दिल्लीमध्ये शरद पवारांशी चर्चा, एटीएसने मागितली वाझेंची कस्टडी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अटकेतील पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे, ठाणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) वाझेंचे प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे.

एटीएसने न्यायालयाकडे वाझेंच्या कस्टडीची मागणी केली. वाझेंच्या अर्जावर शुक्रवारी एटीएसच्या वकिलांनी उत्तर सादर केले. त्याचा अभ्यास करण्यासाठी वाझेंच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. यानंतर जिल्हा न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढककली. त्यामुळे तोपर्यंत वाझेंचा ताबा एनआयएकडेच राहणार आहे. वाझे वापरत असलेल्या आणखी आलिशान कार, त्यांचा मुक्काम असलेले पंचतारांकित हॉटेल आणि मुंबई पोलिस आयुक्तालयांचे कार्यालय या ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकांनी शुक्रवारी दिवसभर तपास केला. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, वाझे यांची खासगीत भेट घेऊ देण्याची त्यांच्या वकिलांची याचिका एनआयए कोर्टाने फेटाळली आहे. दुसरीकडे वाझे हे तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार एनआयएने केली. वाझेंचे वकीलही चौकशीच्या वेळी गैरहजर होते.

परमबीरसिंगांबाबत सेना आणि राष्ट्रवादीच्या विसंगत भूमिका
परमबीरसिंग यांच्या बदलीबाबत बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षम्य आणि गंभीर चुका केल्याचे विधान केले होते. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रात परमबीर यांची पाठराखण करण्यात आली आहे. सकृतदर्शनी वाझे आणि परमबीरसिंगांबाबत शिवसेना व राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे चित्र राज्यात निर्माण करण्यात आले. दिल्लीत मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्नेहभोजनासाठी उपस्थित होते.

मुंबई पोलिस आयुक्तांची भेट
एनआयएचे दोन वरिष्ठ अधिकारी पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला तसेच पोलिस अधीक्षक विक्रम खालाटे यांनी शुक्रवारी मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.

पुणे फॉरेन्सिक टीम एनआयएकडे पुण्यातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या पथकाने एनआयएच्या मुंबईतील कार्यालयाला भेट दिली. मुंबईतील एफएसएल त्या स्कॉर्पिओची तपासणी करत आहे. तसेच मनसुख हिरेन यांच्या व्हिसेऱ्याचेही विश्लेषण करत आहे.

गृहमंत्री देेशमुखांनी पवारांना दिली घडामोडींची माहिती
राज्यात अँटिलिया, वाझे प्रकरणावरून वादळ उठलेले असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट दिल्ली गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा केली. या प्रकरणावरून कोणत्याही मंत्र्याची विकेट जाणार नाही, असे महाविकास आघाडी वारंवार सांगत असली तरी या भेटीगाठींमुळे राजकीय घडामोडींभोवतीचे गूढ आणखीच वाढलेे आहे. सुमारे दोन तासांच्या भेटीनंतर देशमुख म्हणाले, पवारांना अँटिलिया, वाझे प्रकरणातील घडामोडींची सविस्तर माहिती दिली. “एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. राज्य सरकार एनआयएला पूर्ण सहकार्य करत आहे. तपास योग्य दिशेने पुढे सरकत आहे.’ पवार मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर राज्यात मंत्रिमंडळात फेरबदलांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांची १७ फेब्रुवारीला भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. याच दिवशी ही स्कॉर्पिओ चोरीला गेली होती. २५ फेब्रुवारीला स्फोटके ठेवलेली हीच स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडली होती. हिरेन मृत्यूचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

1. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एका मर्सिडीजमध्ये बसून वाझे पोलिस आयुक्तालयातून बाहेर पडत असल्याचे दिसते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ (सीएसएमटी) ही कार पार्क केली जाते.

2. यानंतर हिरेन हे या कारजवळ चालत येतात. कारमध्ये बसून वाझेंसोबत १० मिनिटे चर्चा केल्यानंतर हिरेन पुन्हा बाहेर पडतात. वाझे याच कारने पुन्हा पोलिस आयुक्तालयात परत येतात.

3. एटीएस अधिकाऱ्यांच्या संशयानुसार, या चर्चेदरम्यान हिरेन यांनी स्कॉर्पिओची चावी वाझे यांना दिली होती. हीच कार एनआयएने जप्त केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...