आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?:कायदा आम्हीही जाणतो, धमक्यांना भीक घालत नाही -एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने शिंदे गटाच्या 12 आमदारावर कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रखर ट्विट करीत ''कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे असा पलटवार केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बारा आमदारांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहीले, त्यांना आधीच नोटीस दिली होती; पण त्यानंतरही ते बैठकीला गैरहजर राहीले. त्यामुळे आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना त्यांचे सदस्यत्व कायदेशिररित्या रद्द व्हावे यासाठी याचिका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली मागणी बेकायदेशिर असल्याचे म्हटले आहे यासह त्यांनी तीन आक्रमक ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला उद्देशून ृआपण घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

कुणाला बनवताय?

शिंदे म्हणाले, ''कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

कारवाईची धमकी देऊन घाबरवु नका

शिंदे म्हणाले, 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

धमक्यांना भीक घालीत नाही

आंम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे असा पलटवार त्यांनी केला.