आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत चूक झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.३) विधानसभेत दिली. या चुका आमच्या लक्षात आल्या असून त्या आता पुन्हा होणार नाहीत. कसबा पेठ ही पोटनिवडणूक होती. येथील निकालाने आम्ही सावध झालो आहोत. आता आम्ही कामाने लोकांची मने जिंकू. त्यामुळे कसब्यात पुढे काय निर्णय येईल तो बघा, असे शिंदे यांनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी उत्तर दिले. त्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यांना सरकारची कामगिरी दिसत नाही. दिसली तरी मान्य करायला तयार नाहीत. आमच्यावर घटनाबाह्य सरकार अशी टीका करता, तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात काय? असा सवाल शिंदे यांनी केला. मी असे काही बोललो नाही की त्यामुळे मला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेश करावा लागेल, असा टोला पवार यांना लगावला.
आपल्या नर्मविनोदी शैलीत विरोधी पक्षाने केलेली टीका शिंदे यांनी हसतखेळत परतावून लावली. अजित पवार यांना त्यांना हळुवार चिमटे काढले. विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या टोप्या उडवताना शिंदे यांनी राजकीय मुद्द्यांना स्पर्श केला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची उजळणी करताना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या उत्तरात दिली. त्याच वेळी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला.
कसबा पेठच्या निकालावरून अजित पवार यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सामान्य जनतेने तुम्हालाही पराभूत केले याकडे त्यांनी लक्ष वेधले. कसब्यातील निकालानंतर आता देश आणि राज्य जिंकण्याची भाषा झाली. पण तीन राज्ये भाजपने जिंकली हे विसरले आणि काही जणांची स्थिती ‘बेगाने शादी मैं अब्दुल्ला दिवाना,’ अशी झाल्याचे शिंदे म्हणाले. भाजप पोटनिवडणुकीत हरते आणि राज्य जिंकते, असे स्पष्ट करत महाराष्ट्रात मी भाजपसोबत असून निवडणुकीत माझी मास्टरकी आहे, असा दावा त्यांनी केला.
ठाकरेंना टोला, ऑनलाइन असतानाही खर्च
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या खर्चावरील टीकेलाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षे वर्षा बंगला बंद होता. तिथे फेसबुक, ऑनलाइन असतानाही खर्च झाला. आता माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येतात. मग त्यांना चहापाणी नको द्यायला? चहापाणी देणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे शिंदे म्हणाले.
अजितदादा, कडवट सैनिकासारखे वागू नका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मला धक्का बसला होता, या अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना शिंदे यांनी पहाटेच्या शपथविधीचा आठवण करून दिली. दादांची पहाटेची शपथ माझ्यासाठी मोठा शॉक होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमशी व्यवहार केला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लागले आहे. अजितदादा, तुम्ही कडवट शिवसैनिकासारखे वागू नका, त्यांना जागा ठेवा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.