आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण खरेच कमी पडलो. आता जे झाले ते झाले. ज्यांनी चुका केल्या त्या विश्वासघातकी अधिकाऱ्यांना जरूर शिक्षा करू. पण, देवेंद्र फडणवीस सरकारवर जे धादांत खोटे आराेप करत आहेत, त्याविरोधात आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घातली.
पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट व फोन टॅपिंग प्रकरणावरून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या फडणवीसांना उघडे पाडण्यासाठी मंत्रिमंडळ एकजुटीने कामाला लागले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला पैसे वसुलीचा आरोप आणि गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या उघड झालेल्या फोन टॅपिंग अहवालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परिणामी, बुधवारची साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक वादळी झाली. मंत्र्यांनी फोन टॅपिंगबाबत जोरदार संताप व्यक्त केला. तसेच रश्मी शुक्ला यांच्या चौकशीची एकमुखी मागणी केली. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.
‘मुख्यमंत्री गप्प का?’ फडणवीसांचा सवाल : फोन टॅपिंगप्रकरणी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे वसुली, फोन टॅपिंगच्या १०० प्रकरणांचे पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोपांची राळ उडवली. गृहमंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या; परंतु मुख्यमंत्री ठाकरे गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.
निवृत्त न्यायाधीशामार्फत गृहमंत्री देशमुखांवरील आरोपांची चौकशी करण्याचा आघाडीचा निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या वेळी गृहमंत्र्यांवरील आरोपप्रकरणी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. तसेच परमबीरसिंग यांच्यासह फोन टॅपिंगप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबतही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला मुद्दा
फोन टॅपिंग प्रकरणाच्या चर्चेला गृहनिर्माणमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत तोंड फोडले. शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का, ज्यांची परवानगी घेतली त्यांचेच फोन टॅप केले का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या कटातील त्या मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
मी निर्दोष : अनिल देशमुख
आपण पैसे वसुलीचे कोणासही टार्गेट दिलेले नव्हते. माझ्यावर परमबीरसिंग यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मी निर्दोष असून कोणत्याही चाैकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, अशी भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीत मांडली.
अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून बैठक
तब्बल साडेतीन तास बैठक चालली. राज्यातील वाढता कोरोना संसर्ग, त्यावरचे उपाय यावर चर्चा झाली. तसेच कोविडच्या राज्यातील स्थितीवर आरोग्य विभागाने एक सादरीकरण केले. बैठकीच्या शेवटच्या तासात सर्व अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पाठवण्यात आले. या वेळी परमबीरसिंग आणि रश्मी शुक्ला यांच्या आरोपांसंदर्भात चर्चा झाली.
गृहमंत्र्यांविरोधातील याचिका हायकोर्टात दाखल करण्याचे परमबीर यांना निर्देश
नवी दिल्ली |गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना दिले. सिंग आणि गृहमंत्री यांचे एकमेकांविरुद्धचे आरोप-प्रत्यारोप गंभीर आहेत, असेही न्यायमूर्ती संजय कौल यांच्या खंडपीठाने नमूद केले.
मंत्र्यांचे फोन टॅप होत असतील तर कामे कशी करायची : काँग्रेसचा सवाल
मंत्र्यांचे फोन टॅप होत असतील तर आम्ही कामे कशी करायची, असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. जे अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी काम करत आहेत, त्यांना मोक्याच्या जागी नेमता कामा नये, अशी मागणी बैठकीत पुढे आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.