आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शड्डू ठोकले:आम्ही सरकार पाडणार नाही, तुम्हीचते चालवून दाखवा : विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातच कार्यरत, महाराष्ट्रापासून कशी दूर जाईन : पंकजा मुंडे

‘महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेले सरकार आहे, असा आरोप करून हे सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. तुम्हीच किमान हे सरकार चालवून दाखवा,’ असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिले.

प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक सोमवारी दादर येथील वसंत स्मृती येथे व्हर्च्युअल पद्धतीने झाली. या बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने झाला. या बैठकीला फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश तसेच राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ‘ठाकरे सरकार धोक्याने आलेलं सरकार आहे. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या ओढायला सक्षम आहात. पण तुम्ही किमान सरकार चालवून दाखवावं. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणं आमचं काम आहे,’ असे फडण‌वीस म्हणाले.

फडणवीसांनी सरकार पडायची वाट पाहावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात महाराष्ट्रातील सरकार आम्ही पाडणार नाही, महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल तर मग फडणवीसांना माझा सल्ला आहे की, शांत राहून त्यांनी सरकार पडायची तर वाट बघावी, अशी टीका ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. खरं तर वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी, प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. परंतु ते राहिलं बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी भाजपने कार्यकारिणीची बैठक बोलावली,असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

बांधावरचं सरकारी बियाणं खोटं
‘शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचा आक्रोश वाढत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कापूस खरेदीही होत नाही. भुकटीसाठी अनुदान दिले, हजार कोटी अनुदान राज्याने आमच्या काळात दिले. ७ लाख लिटर दूध कुणाचं विकत घेतलं ते सांगा, कोणत्या डेअरीचे मालक आहेत त्यांची माहिती द्या, बांधावर बियाणे देऊन खत देणार, मात्र सरकारी बियाणंच खोटं निघालं,’ असा घणाघातही देवेंद्र फडणवीसांनी केला.

स्टिअरिंग उद्धव यांच्या हातात, मात्र ऑटोने कुठे जायचे हे सवारी ठरवते
ऑटो कुठे जाईल हे सवारी ठरवते : आघाडी सरकार हे तीनचाकी वाहन असून त्याचे स्टिअरिंग माझ्या हातात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर ऑटोरिक्षाचे स्टिअरिंग जरी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हातात असले तरी रिक्षा कुठे जाणार हे मागे बसलेली सवारी (प्रवासी) ठरवते, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

स्वबळावर सत्तेसाठी कटिबद्ध राहा
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

राज्यातच कार्यरत, महाराष्ट्रापासून कशी दूर जाईन : मुंडे
मी आज राज्यातच कार्यरत आहे. नव्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आज मला बोलावण्यात आले आहे. मी महाराष्ट्रापासून कशी दूर जाईन, असा उलट सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना केला.