आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही लवकरच सत्तेत येणार!:मनसे नेते अमित ठाकरेंचे सूचक वक्तव्य, मुंबई पालिका निवडणुकीसाठी पुन्हा युतीची चर्चा

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही लवकरच सत्तेत येणार, असे सूचक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले आहे. सत्ता मुंबईत येईल की राज्यात, हे मात्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे.

शासकीय यंत्रणा हाताशी हव्यात

अमित ठाकरे यांनी आज दादर चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. यावेळी गणेशोत्सवानंतर चौपाटीवरील अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अमित ठाकरे म्हणाले, 10 दिवसांच्या उत्सवानंतर असे दृश्य पाहवत नाही. समुद्र किनाऱ्यांवर कायमस्वरुपी स्वच्छता ठेवण्यासाठी हाताशी शासकीय यंत्रणा हव्या असतात. आम्ही सत्तेत आल्यावर याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करणार. लवकरच सत्तेत येणार.

BMCसाठी महायुती होणार?

मुंबई महापालिकेसाठी शिंदे गट-भाजप-मनसे यांची महायुती होणार, अशा चर्चा सध्या जोरात आहेत. राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, याआधीही अमित ठाकरेंना शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर

शिंदे गट व मनसेची युती होणार का?, याबाबत अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे बोलण्यास मात्र नकार दिला. मनसेप्रमुख राज ठाकरेच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी नवरात्रीनंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदा वेगळाच उत्साह

मुंबईतील गणेशोत्सवाबाबत अमित ठाकरे म्हणाले, मुंबईत रात्री तीन वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. दोन-अडीच वर्षांच्या करोना काळानंतर यावर्षी सर्वच सणांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळाला.

ठाकरेंची स्वच्छता मोहीम

अमित ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत अनेक पर्यावरणप्रेमींसह दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोहीमेत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...