आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंची अयोध्या वारी:म्हणाले - हा राजकीय दौरा नसून आमची तिर्थयात्रा, अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा मागणार

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हा आपला राजकीय दौरा नाही. तर ही आमची तिर्थयात्रा असल्याचे म्हटले. आदित्य ठाकरे माध्यमांना विनंती करत म्हणाले की, अयोध्येतील उत्साह आणि जल्लोषाचे वातावरणाचे चित्र माध्यमांनी सगळ्यांना दाखवावे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहोत. उत्साह आणि जल्लोष तसाच आहे. मंदिर निर्माण होत असताना आज देशभरातून शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. 2018 मध्ये आम्ही अयोध्येत आलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'आधी मंदिर नंतर सरकार' अशी घोषणा केली होती. त्यानंतर योगयोगाने मंदिराच्या बाजूने निकाल लागला आणि सुंपूर्ण प्रकिया झाली. आज आम्ही अयोध्येत आलो आहोत. ही आमची तिर्थयात्रा आहे. हा राजकीय दौरा नाही. येथे राजकारण नाही तर दर्शन घेण्यासाठी आलो आहोत.

पुढे ते म्हणाले की, निवडणुका आणि राजकारण यांचा काहीच संबंध नाही. शक्ती आणि भक्ती आमच्यासाठी एकच आहे. आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे आणि हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. शिवसेनेचे हिंदुत्व सगळ्यांना माहिती आहे. प्राण जाए पर वचन ना जाए. मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणाच्या अटी-शर्ती नाही. अयोध्येत आमचे साधूमहंतांकडून स्वागत करण्यात आले. अयोध्या ही आस्थेशी जोडलेली भूमी आहे. आम्ही सेवाभावाने येथे आलो आहोत. 70 च्या दशकात इस्कॉन मंदिराला बाळासाहेबांनी भेट दिली होती. त्यामुळे इस्कॉन ट्रस्टने मला बोलावल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. या जन्मभूमीत रामलल्लांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यामध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील भाविकांची अयोध्येत योग्य सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणून महाराष्ट्र सदन अयोध्येत उभारण्यासाठी जागा द्यावी, ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना करणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योगींशी पत्र व्यवहार करणार आहेत. 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन इथे आम्हाला बनवायचे आहे.

राज ठाकरे यांच्यावर बोलणे टाळले -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणे टाळले. मी दुसऱ्याच्या भूमिकेवर बोलणार नाही. माझे भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. कोरोना काळात महाराष्ट्रात परराज्यातील लोकांना प्राधान्य दिले. कोण कोणाचे स्वागत करत आहे. त्यापेक्षा मंदिर निर्माण व्हावे यासाठी पुढाकार घ्यावा. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकतो. दुसऱ्या पक्षाशी नाही, असे ते म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा आता प्रचार यंत्रणा झाल्या असून ते पक्षाच्या अंग झाल्या आहेत.

आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

विमानतळाबाहेर माध्यमांशी बोलताना -

सकाळी मुंबईहून आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशसाठी रवाना झाले. सकाळी 11 वाजता ते लखनऊ विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना हा दौरा राजकीय नाही. हा श्रद्धेचा विषय असून मी दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य म्हणाले की, देवळात गेल्यावर मागणे मागण्यापेक्षा मी आशीर्वाद घेत असतो. जे काही दिले आहे, सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यााठी धन्यवाद बोलत असतो. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नाही. ही भूमी भारताच्या आस्थेची आहे. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. हातून चांगेल कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकदेखील मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतही आदित्य यांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्येमध्ये दिवसभराचा कार्यक्रम आहे.

असा आदित्य ठाकरेंचा दौरा

सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचे लखनऊ विमानतळावर आगमन झाले.

दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत पोहचले.

दुपारी 2 वादता इस्कॉन मंदिराला भेट दिली.

दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद घेतली.

दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार आहेत.

संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार.

संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार.

संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या तिरावर आरती करणार

संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान करत परतीचा प्रवास

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा याआधी 10 जूनला निश्चित करण्यात आला होता. पण, राज्यसभा निवडणुकीमुळे अयोध्या भेटीची तारीख बदलून 15 जून करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...