आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या रागातून शिंदे गटाच्या महिलांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप उद्धव सेनेच्या रोशनी शिंदे या महिलेने केला. सोमवारी सायंकाळी ठाण्यातील कासार वडवली भागात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या रोशनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर ठाण्यात राजकारण चांगलेच तापले.
उद्धव ठाकरे यांनी तिची भेट घेतल्यानंतर शिंदे - फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. मग देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरेंना उघड धमकीच दिली. या नेत्यांच्या अत्यंत गलिच्छ वक्तव्ये, वर्तनामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र उशिरापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. तर बुधवारी उद्धव सेना या हल्ल्याविरोधात ठाण्यात मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे त्याचे नेतृत्व करतील.
मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोस्टमुळे रोशनी शिंदेंवर हल्ला केल्याचा आरोप; फिर्याद घेण्यास पोलिसांचा नकार
सोशल मीडियावर बदनामीचा आरोप, जखमी महिलेवर गुन्हा
ठाण्यात सोमवारी शिंदे गटाच्या प्रवक्त्याने रणजित इंगळे या पत्रकाराला धमकी दिली होती. त्याबद्दल युवा सेनेची रोशनी शिंदे हिने पोस्ट केली होती. ‘दिघे साहेब असते तर त्यांनी अशा वेळी काय केले असते ते सर्वांना माहितीय. नुसतं आनंद मठ नावावरून काही होत नसतं,’ असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या महिलांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार रोशनी यांनी केली. त्यांची फिर्याद पोलिसांनी घेतली नाही. उद्धव, आदित्य व रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रोशनीची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. पोलिसांनाही जाब विचारला. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी मात्र आम्ही रोशनीला समजावण्यास गेलो, पण ती उलटसुलट बाेलली तेव्हा फक्त धक्काबुक्की झाली. मारहाण झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्या तक्रारीवरून रोशनीविरोधात शिवसेनेची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
गर्भवती महिलेला अमानुष मारहाण झाल्याचा आरोप
उद्धव सेनेचे खासदार राजन विचारे यांनी रोशनी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. एका गर्भवतीला अमानुष मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या गर्भवती नव्हत्या तर मातृत्वासाठी उपचार घेत होत्या, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. रुग्णालयात जाऊन रोशनी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
डॉक्टर म्हणतात.. मुका मार लागला, पण गर्भवती नाही
डॉ. उमेश आलेगावकर : सोमवारी रात्री १०.३० वाजता रोशनी शिंदे यांना जिल्हा रुग्णालयातून आमच्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या हलक्या खुणा होत्या. पाठीवर मुका मार लागल्याचे आढळले. युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली ती निगेटिव्ह आहे. मंगळवारीही तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली तीही निगेटिव्ह आली.
दोन्ही गटांकडून बेताल बोल
गृहमंत्री फडतूस नव्हे, काडतूस
आशिष शेलार : ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिलाय. मारहाणीचे समर्थन आम्ही करणार नाही. पण खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ ठाकरेंनीच रोवलीय.
ठाण्यात आता नवी ‘मोगलाई
जितेंद्र आव्हाड : पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्यास माझ्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली. यात मला अडकवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. ठाण्यात ही ‘नवी मोगलाई’ आलीय.
महाराष्ट्रात गेले नऊ महिने ‘तमाशा’
खा. राजन विचारे : महाराष्ट्र नऊ महिने हा तमाशा आणि अत्याचार पाहत आहे.बाळासाहेब व आनंद दिघेंचे नाव घेणाऱ्यांना महिलेवर हल्ला करणे शोभते का?
खासदारकीसाठी विचारे यांचे षड्यंत्र
नरेश मस्के (शिंदे गट) : ठाण्यात आपली खासदारकी वाचवण्यासाठी राजन विचारेंनी महिला कार्यकर्तीवर हल्ला झाल्याचा बनाव रचला होता. डॉक्टरांच्या अहवालाने त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
आपले गृहमंत्री फडतूस, लाचार, सरकार नपुंसक : उद्धव ठाकरे
ठाण्यात गुंडागर्दी वाढतेय. यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडा मंत्री? राज्याला फडतूस गृहमंत्री, लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री लाभलाय. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. महिलांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. सरकारला कोर्ट नपुंसक म्हणाले होते त्याची प्रचिती काल आली.
भ्रष्टांची लाळ घोटणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये : देवेंद्र फडणवीस
जेलमध्ये गेलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे न घेता त्यांची व वाझेसारख्या भ्रष्टांची लाळ घोटणाऱ्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. सध्या ते नैराश्यातून काहीही बोलत आहेत. पण जर आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल.
बेइमान घरकोंबड्याला रस्त्यावर फिरू देणार नाही : बावनकुळे
काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळवणाऱ्या बेइमान व घरकोंबड्याने देवेंद्रजींबद्दल आक्षेपार्ह बोलणे योग्य नाही. पुन्हा असे बोलाल तर आम्हाला मातोश्रीसमोर यावे लागेल. मग मात्र तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळवणाऱ्या बेइमान व घरकोंबड्याने देवेंद्रजींबद्दल आक्षेपार्ह बोलणे योग्य नाही. पुन्हा असे बोलाल तर आम्हाला मातोश्रीसमोर यावे लागेल. मग मात्र तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही.
दिव्य मराठी विश्लेषण
भाजपला थेट अंगावर घेऊन पक्ष बळकटीची ठाकरेंची रणनीती
शिवसेनेत उभी फूट पडून सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंडखोर एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त राग भाजपवर आहे. कारण या सत्तानाट्याची सूत्रे भाजपने हलवली हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे मोदी - शहांवर टीकेची एकही संधी ठाकरे सोडत नाहीत. असे असले तरी राज्यातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मात्र ते तितकेसे कठोर नव्हते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान भवन परिसरात योगायोगाने एकत्र आलेले ठाकरे - फडणवीस हास्यविनोदात रमल्याचे सर्वांनी पाहिले, त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चाही रंगल्या. मात्र ठाण्यातील हल्ल्याचे प्रकरण गांभीर्याने घेत ठाकरे यांनी शिंदेंपेक्षा फडणवीसांवर ज्या कठोर शब्दांत हल्ला चढवला त्यावरून मैत्रीचे सर्व दोर कापले गेल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना दिला. इतकेच नव्हे तर कमी संख्येने उरलेल्या राज्यातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यात आपल्या मागे पक्षप्रमुख भक्कम उभे असल्याची भावनाही निर्माण करण्यात यानिमित्ताने उद्धव यशस्वी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता मोदी- शहांविरोधात आरपारची लढाई लढत आहेत, तीच आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील सर्व भाजपविरोधी मतदारांना आकर्षित करण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.