आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:शुक्लांवर एवढा विश्वास का ठेवला? महाविकास आघाडीला संजय राऊत यांचा सवाल

दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात

एकदा हात पोळूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या अनुभवानंतर शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महविकास आघाडीच्या सरकारला शुक्रवारी नवी दिल्लीत सुनावले.

सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते. तरीही महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच ते सहा महिने त्या पदावर कशा राहिल्या? याचे मला आश्चर्य वाटते. एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. शरद पवारही याच मताचे आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेत्यांना दिल्लीत कागद फलकावयची संधी मिळाली नसती, असे राऊत यांनी म्हटले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे राऊत म्हणाले. राऊत यांच्या वक्तव्यानंत आता सरकारमधील मंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांसह माझाही फोन टॅप झाला होता
अधिकाऱ्यांवर कधीही विसंबू राहू नका, अस्तनीतल्या निखाऱ्यांना वेळीच दूर करा, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे नाट्य सुरू असताना शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांवरही नजर ठेवली जात होती. इतके करूनही भाजपची सत्ता आली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

यूपीएचा मुद्दा, राज्यातील नेत्यांनी यात पडू नये
यूपीए अध्यक्षपदाचा विषय केंद्रातील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार, याचे उत्तरही या नेत्यांनी द्यावे, असा टोला संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.

बातम्या आणखी आहेत...