आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापत्न वागणूक:गोवा, गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला कोळसा पुरवठा का होत नाही? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोळसा व विजेच्या तुटवड्याची सद्यस्थिती

गुजरात व गोवा या शेजारच्या राज्यांत वीज उत्पादन अतिरिक्त आहे तरी या राज्यांना कोळशाचा मुबलक पुरवठा होतो. महाराष्ट्रात विजेची मागणी वाढली असताना कोळशाची टंचाई निर्माण केली जात आहे, असा आरोप राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी मंगळवारी केला. कोळशाच्या टंचाईला राऊत यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले. राज्यात विजेची तूट असली तरी कुठेही भारनियमन केले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, कोळसा पुरवठा वाढावा म्हणून ५ ऑगस्ट रोजी मी कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवले होते. २४ सप्टेंबर रोजी मी केंद्रीय कोळसा मंत्री व केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याशी फोनवर बोललो. सचिवांना दिल्लीत जाऊन कोळसा व ऊर्जा विभागाच्या सचिवांशी बोलायला सांगितले. त्या कोळसा खाणीत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना पाठवून कोळसा उपलब्धतेचा आढावा घ्यायला सांगितले आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी झाली आहे. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नाही, असा दावा राऊत यांनी केला. मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॅट विजेची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.

कंपन्यांना नोटीस बजावणार : ज्या कंपन्यांशी वीजखरेदीचा दीर्घकालीन करार केलेला आहे. त्या सीजीपीएल आणि जेएसडल्बू या कंपन्यांनी स्वस्त वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे १ हजार मेगावॅट तुटवडा निर्माण झाला. या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात येतील, असे राऊत म्हणाले.

वीजनिर्मिती दुपटीने वाढली
भुसावळ | राज्यात वीज मागणी वाढल्याच्या काळातच कोळसाटंचाईमुळे दीपनगरातील ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ५ बंद होता. सोमवारी मध्यरात्री १२ वाजता हा संच लाइटअप केल्याने मंगळवारी केंद्रातून दुपटीने वीजनिर्मिती होत राज्याला ७६८ मेगावॅट वीजपुरवठा झाला. त्यापैकी संच ५ मधून ४३५ मेगावॅट वीजनिर्मिती झाली. परिणामी राज्यात निर्माण झालेल्या ३३०० मेगावॅट पैकी काही तूट भरून निघाली. पावसामुळे खाणींमध्ये पाणी शिरून कोळसा उत्पादन घटले. यामुळे राज्यातील विजेची तूट वाढली आहे. दरम्यान, कोळशाअभावी चार दिवसांपूर्वी दीपनगरातील ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक ५ बंद करण्यात आला होता. यामुळे राज्यातील विजेची तूट वाढून ३३०० मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. नेमके या काळात केंद्रात २९ हजार मेट्रिक टन कोळसा साठा झाला. शिवाय दररोजही कोळसा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे महानिर्मितीने दीपनगरातील बंद असलेला संच ५ सोमवारी मध्यरात्री १२ वाजता लाइटअप केला. मंगळवारी सकाळी या संचातून वीजनिर्मिती सुरू झाली. सध्या या संचातून ४३५ मेगावॅट, तर संपूर्ण दीपनगर केंद्रातून एकूण ७६८ मेगावॅट विजेचा राज्याला पुरवठा होत आहे. दीपनगर केंद्राला सध्या दररोज चार रॅक कोळसा मिळत आहे. हा पुरवठा वाढल्यास बंद असलेला २१० मेगावॅटचा संचही सुरू करता येईल, असे महानिर्मितीचे प्रयत्न आहेत.

टंचाई पाहता विजेची बचत करा
वीजटंचाई लक्षात घेता सकाळ व संध्याकाळी ६ ते १० या वीज मागणीच्या कमाल कालावधीत वीज बचत करा, असे आवाहन मंत्री राऊत यांनी केले. ऑगस्ट महिन्यात दुर्दैवाने पावसाने ओढ दिली व त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. या मागणीची पूर्तता करण्यासाठी १८ लाख मेट्रिक टन कोळसा साठा वापरावा लागल्याचे राऊत यांनी सांगितले.

कोराडी, खापरखेड्यात दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा
नागपूर | कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सध्या २१० मेगावॅटचे दोन व ६६० मेगावॅटचे तीन संच कार्यरत आहेत. खापरखेड्यात २१० मेगावॅटचे ४ व ५०० मेगावॅटचा एक असे पाच संच सुरू आहे. कोराडीची स्थापित वीजनिर्मिती क्षमता २४०० मेगावॅट असून दुपारी १२.४० वाजेपर्यंत १३३७ मेगावॅट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती महाजेनकाेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी दिली. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची स्थापित क्षमता १३४० मेगावॅट असून दुपारी १२.४० वाजेपर्यंत १०२६ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोराडी आणि खापरखेडा येथे दीड दिवस पुरेल इतका कोळसा साठा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...